पुण्यात अजस्र होर्डिंग कोसळून चार ठार, 11 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
6 ऑक्टोबर पुण्यात जाहिरात फलक कोसळून चौघांचा मृत्यू, 11 जखमी.

सामना प्रतिनिधी । पुणे

पन्नास ते साठ फूट उंच होर्डिंग, हजारो किलो त्याचे वजन. अजस्र असा हा सांगाडा शाहीर अमर शेख चौकातील सिग्नलवर भरदुपारी वाहतूक सुरू असताना कोसळला. पाच रिक्षा आणि दुचाकीस्वार यात सांगाडय़ाखाली सापडले. रेल्वे खात्याच्या बेफिकिरीने चार निष्पापांचे बळी गेले. 11 जण जखमी झाले. कमकुवत सांगाडा वरून काढण्याऐवजी गॅस कटरने थेट बुडातूनच कापण्याचा तुघलकी कारभार केला. हा सांगाडा पडताच तेथील रेल्वेच्या कामगारांनी पळ काढला. ही संतापजनक दुर्घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, ठेकेदार आणि मजुरांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वेने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

पुण्यातील मध्यवस्तीतील मंगळवार पेठेत जुन्या बाजाराजकळील शाहीर अमर शेख चौकात रोज प्रचंड गर्दी असते. शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आरटीओ चौकाकडून ससून आणि शनिवारवाडय़ाच्या दिशेने जाण्यासाठी निघालेली वाहने सिग्नलवर उभी होती. त्याच वेळी कडकड असा आवाज झाला. काही कळायच्या आत प्रचंड असा मोठय़ा होर्डिंगचा लोखंडी सापळा उभ्या असलेल्या रिक्षा, दुचाकी, कारवर येऊन पडला. वाहनांचा चक्काचूर झाला. प्रचंड मोठे होर्डिंग पडल्याचे कळताच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. जखमींना रिक्षातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शेकडो नागरिक हत्तीचे बळ अंगात आणून होर्डिंग उचलून त्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण हजारो किलो वजन असलेल्या लोखंडाला बाजूला काढणे अशक्य झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आईच्या अस्थिविसर्जनाहून येणाऱया वडिलांवरही मृत्यूचा घाला

 पायाची शस्त्रक्रिया करताना अचानक रक्तदाब कमी होऊन गुरुवारी आईचा मृत्यू झाला. गुरुवारी सर्व क्रियाकर्म आटोपून शुक्रवारी सकाळीच वडिलांबरोबर आळंदी येथे जाऊन आईच्या अस्थी विसर्जित केल्या. डोळ्यांतील अश्रूंना वाट करून देत आळंदीहून माघारी फिरलो. आईविना मुलांचा सांभाळ करायचा आहे असेच भाव वडिलांच्या डोळ्यांत होते, मात्र नियतीने समोर वेगळेच वाढून ठेवले होते. चौकातील सिग्नलला रिक्षा थांबविली आणि क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. रिक्षावर होर्डिंग कोसळला आणि डोळ्यांसमोर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. आईच्या अस्थिविसर्जनाहून येत असतानाच काळाने वडिलांवर घाला घातला आणि चार वर्षांचा समर्थ आणि 17 वर्षांची समृद्धी पोरके झाले. नाना पेठेत राहणारे रिक्षा व्यावसायिक शिवाजी देविदास परदेशी यांचा आज होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. कालच शिवाजी परदेशी यांच्या पत्नी प्रीती परदेशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थींचे विसर्जन करून परत येताना काळाने शिवाजी परदेशी यांच्यावरही घाला घातला.

मृत आणि गंभीर जखमी

शामराव राजाराम धोत्रे (45), भीमराव गंगाधर कासार (70), शिकाजी देकीदास परदेशी (40), जाकेद निसुद्दीन खान (45) हे चौघे ठार झाले. उमेश धर्मराज मोरे (36) यांची प्रकृती गंभीर आहे.

काळ आला पण वेळ आली नव्हती…

‘काळ आला पण वेळ आली नव्हती…’ या म्हणीचा प्रत्यय होर्डिंग्ज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोन रिक्षाचालकांनी घेतला. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात मोठे हेर्डिंग्ज कोसळले तेव्हा हे दोन्ही रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन सिग्नलला उभे होते. त्यांच्या रिक्षावरही होर्डिंग्ज कोसळले आणि रिक्षांचा अक्षरशŠ चुराडा झाला. मात्र, दैव बलवत्तर असल्याने या दोनही रिक्षाचालकांना कोणतीही इजा झाली नाही.