कोपरगाव बाजार समिती संचालक अजित लोहाडे यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत व्यापाऱ्यांवर अनेक आरोप करण्यात आले. भर सभेत आरोप-प्रत्यारोप उफाळून आले होते. त्या‍नंतर एका आठवडयात आणखी एक नवा वाद समोर आला आहे. व्यापारी मतदार संघाचे संचालक अजित नेमीचंद लोहाडे यांनी आजारपणाचे कारण देत आपल्या संचालक पदाचा राजीनामा प्रभारी सचिव विष्णू पवार यांच्याकडे सोपवला आहे. मात्र लोहाडे यांनी राजीनामा दिला नसून, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. समितीचा कारभार सोशल मिडीयावर टाकून चव्हाट्यावर आणल्यापासून संचालक मंडळ व व्यापाऱ्यांमध्ये धुसपूस सुरु होती. त्यानुसार हा राजीनामा दिला, असेही सांगितले जात आहे.

बाजार समितीमध्ये कोल्हे गटाचे पाच, काळे गटाचे आठ, औताडे व परजणे गटाचे प्रत्येकी दोन असे बलाबल आहे. बाजार समितीमध्ये काळे कोल्हे परजणे गटाची सहमती महत्त्वाची आहे. त्यामुळे यावर्षी सभापती म्हणून कोल्हे गटाचे संभाजी रक्ताटे तर उपसभापती राजेंद्र निकोले हे काळे परजणे गटाचे काम पाहत आहेत. गेल्या 29 तारखेला बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. त्यात बरेच वादविवाद चव्हाट्यावर आले. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी माहिती अधिकारात विविध माहिती मिळवून समितीच्या कारभार सोशल मिडीयावर टाकून चव्हाट्यावर आणला. तेव्हापासून संचालक मंडळ व व्यापाऱ्यामध्ये धुसपूस सुरु असल्याचे समजते. त्याच कारणातून कांदा व्यापाऱ्यांची बैठक होऊन लोहाडे यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे.त्यावरून लोहाडे यांनी आपला राजीनामा प्रभारी सचिव पवार यांच्याकडे दिला आहे. आता बाजार समितीची आगामी सभा 24 किंवा 25 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात हा राजीनामा ठेवला जाणार असल्याचे समजले .याबाबत सभापती रक्ताटे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. एकीकडे शेतकरी हितासाठी बाजार समितीची स्थापना केली. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे बहुतांशी निर्णय टाळण्यात येतात. भाव कमी दिला जातो. अशा वारंवार तक्रारी असतात. त्यामुळे येथील बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अखेर व्यापाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर लोहाडे यांनी प्रभारी सचिव विष्णू पवार यांच्याकडे तडकाफडकी राजीनामा दिला. काही संचालकांनी याला दुजोरा दिला आहे.