दीपिकाचे मुंडके उडवणाऱ्याला 10 कोटींचे बक्षिस! वादग्रस्त नेत्याची भाजपात घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे मुंडके उडवणाऱ्याला 10 कोटींचे बक्षिस जाहीर करून प्रकाशझोतात आलेल्या भाजप नेत्याच्या घरवापसी झाली आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटादरम्यान हरयाणा भाजपचे नेते सूरजपाल अमू यांनी ही घोषणा केली होती. करणी सेनेचे नेते सूरजपाल अमू यांनी राजीनामाही दिला होता. परंतु आता हरयाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांनी अमू यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. पक्षाच्या या धोरणावर अमू यांनी आनंद व्यक्त केला असून ही माझ्यासाठी एकप्रकारे घरवापसी असल्याचे प्रतिक्रिया दिली आहे.

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित आणि रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या पद्मावत चित्रपटावरून मोठा वाद झाला होता. हरयाणा आणि राजस्थानमध्ये करणी सेनेने या चित्रपटातील एका गाण्यावरून आक्षेप घेत गोंधळ घातला. याच दरम्यान, करणी सेनेचे नेते सूरजपाल अमू यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये हरयाणा भाजपच्या मुख्य मीडिया समन्वयक पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. परंतु सोमवारी हरयाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनी हा राजीनामा नामंजूर केला.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूरजपाल अमू म्हणाले की, ‘मी भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता आणि आता हरयाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनी तो नामंजूर केला आहे. ‘तसेच ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या 29-30 वर्षात मी पार्टीच्या विविध पदांवर आणि विद्यार्थी संघटनांसाठी काम करत आलो आहे. पक्षापासून लांब राहिल्याने गेल्या आठ महिन्यात मला खूप त्रास झाला. परंतु तरीही मी अनेक सामाजिक संघटनांसाठी काम करत होतो. सध्या मला घरवापसी झाल्यासारखे वाटत आहे.’

सूरजपाल अमू आणि वाद
पद्मावत चित्रपटावेळी सूरजपाल अमू यांनी दीपिकाचे मुंडके उडवणाऱ्याला 10 कोटींचे बक्षिस जाहीर केले होते. तसेच जोधाबाईवरून सपाचे नेते आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून अमू यांनी त्यांना नपुंसक असे म्हटले होते. तसेच पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख न करता, अशा राक्षसी प्रवृत्तीच्या महिलांचा वेळीच उपचार करायला हवा असे म्हटले होते. यासाठी त्यांनी रामायणातील शुर्पणखा प्रकरणाचे उदाहरण दिले होते.