अंबाबाईचे लाइव्ह दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

नवरात्रोत्सवादरम्यान करवीर निवासिनी श्री अंबामातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, भाविकांना लाइव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.

बुधवारपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबामातेच्या मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी बुधवारी देवीची कोल्लूर मुकांबिका, गुरुवारी ब्राह्मी, शुक्रवारी महिश्वरी, शनिवारी कौमारी, रविवारी प्रत्यंगिरा, सोमवारी वैष्णवी (श्यामला मातंगी), मंगळवारी महिषासुरमर्दिनी आणि बुधवारी विजयादशमी (दसऱ्याच्या) दिवशी देवीची रथातील सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासन तसेच महावितरणसह विविध विभागांकडून भाविकांना नवरात्रोत्सवाच्या काळात पुरविण्यात येणाऱ्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.