
सामना प्रतिनिधी । मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळय़ातील मुख्य आरोपी आणि सोलापूर जिह्यातील मोहोळचा आमदार रमेश कदमच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली. मंत्रिपरिषदेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे रमेश कदमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. विद्यमान विधानसभा सदस्याच्या विरोधातील दोषारोपपत्राला मंत्रिपरिषदेने मंजुरी देण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
2009 ते 2014 या दरम्यान आघाडी सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी कदमची वर्णी लावली. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. महामंडळातील अधिकाऱयांना हाताशी धरून कदमने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचे 2015 मध्ये उघडकीस आले. स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून कदम आणि महामंडळातील अधिकाऱयांनी कोटय़वधींची माया जमवल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
n आमदाराच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी मंत्रिपरिषदेची मान्यता घ्यावी लागते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यासंदर्भात राज्य सरकारला शिफारस केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत रमेश कदमसह महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रवण बावणे, तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड तसेच लिपीक सुजित पाटील यांच्याविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यास मंत्रिपरिषदेने मान्यत दिली. या मान्यतेनंतर हा प्रस्ताव पुन्हा राज्यपालांना सादर केला जाणार आहे.



























































