लोकलमधले मुजोर ‘डोअर किपर’ गजाआड, रेल्वेची धडक मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकलच्या दरवाज्यात उभे राहून इतर प्रवाशांना आत जाऊ देण्यास मज्जाव करणाऱ्या मुजोर ‘डोअर किपर’ वर कारवाईची धडक मोहीम सध्या पश्चिम रेल्वेने सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत विरार ते बोरिवली दरम्यान फक्त पाच दिवसात 94 जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेने देखील कारवाई सुरु केली असून डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांमध्ये एका दिवसात 29 प्रवाशांना पकडल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकलच्या दरवाज्यात गर्दी करून उभे राहून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना आत जाऊ न देणे, सीट अडवून बसणे, विरोध करणाऱ्याला दमदाटी किंवा मारहाण करणे असे प्रकार लोकल ट्रेनमध्ये सातत्याने घडायला लागले आहेत. याबाबत प्रवाशांनी अनेकवेळा तक्रारी देखील केल्या होत्या. या तक्रारींबाबत रेल्वे प्रशासन उशिराने का होईना पण आता जागं झालं आहे.  दरवाजा आणि सीट अडवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाच पथके तयार केली आहेत. प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास अडथळा निर्माण करणे हा गुन्हा असून, याप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास किंवा 500 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. मात्र तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने लोकलमधले गुंड मोकाट होते. पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या कारवाईमुले या गुंडांना पायबंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.