दोनच वेचणीत संपणाऱ्या कापसामुळे शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

कमी झालेला पाऊस आणि पुन्हा बोंडअळीने केलेला हल्ला, यामुळे यंदाही कपाशीचे उत्पन्न तीस टक्क्यापेक्षा जास्त मिळणार नाही. दोनच वेचणीत शेतजमीन रिकामी होईल, असे म्हणत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीचे विदारक चित्र मांडले. त्याचवेळी दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची पातळी खालावली असून काही शेतकऱ्यांनी आता दुधी भोपळय़ाचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. कारण, वेलवर्गीय उत्पादनाला फारसे पाणी लागत नाही. परंतु, शेतकऱ्यांच्या धडपडीला सरकारच्या मदतीचा हात हवाच, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

धुळे जिल्हय़ात यंदा सलग चौथ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्यावर्षी शासनाने हो-नाही म्हणत दुष्काळ जाहीर केला. त्यातच बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱयांना अडचणीत आणले. यंदा बोंडअळीचा फटका बसू नये म्हणून अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या. पण, दुर्दैवाने यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. खरिपाची पिके जवळपास नष्ट झाली. या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील कुंडाणे-वरखेडे शिवारात शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला सुरुवात केली आहे. वरखेडी शिवारातील गजानन माळी यांच्या शेतात कापूस वेचणी होत असताना त्यांनी विदारक परिस्थिती स्पष्ट केली.

यंदाही कपाशीचे उत्पन्न जास्तीत जास्त 30 ते 35 टक्के येईल. त्यामुळे शेतकऱयांच्या हाती काहीच लागणार नाही. उत्पादनावरील खर्च आणि केलेली मेहनत बऱयापैकी वाया जाणार आहे. कुटुंबासमोर आर्थिक चणचण राहणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न गजानन माळी यांनी उपस्थित केला.

यंदा सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. बँका पैसे देत नाहीत. त्याचवेळी सावरकारांकडे पत राहिलेली नाही. दुष्काळाने पत घालवली, असे म्हणत वरखेडी येथील धनसिंग देवरे या शेतकऱ्याने त्याची कैफीयत मांडली. धनसिंग देवरे यांनी सांगितले की, पाऊस नसल्याने विहिरीला पुरेसे पाणी नाही. तास-दोनतास कृषी पंप चालला की विहिरीचे पाणी खाली जाते. कमी पाण्यात कुठले उत्पन्न घेणार हा प्रश्न आहे. परंतु चरितार्थासाठी आता याच क्षेत्रात दुधी भोपळय़ाची लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय कमी कालावधीत उत्पन्न येऊ शकते, असा आशावाद देवरे यांनी व्यक्त केला.

summary-drought affects on cotton farmers