दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठपैकी तीन आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. उर्वरित पाच आरोपी अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा एका आंतरराज्यीय फरार आरोपीशी संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून, या आरोपीकडून तीन अग्निशस्त्रे, सहा जिवंत काडतूसे, एक एअर पिस्टल व धारदार खंजर जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हा शाखेचे एक फिरते पथक पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या नेतृत्वात फिरत असताना मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना हत्यारांची तस्करी करणाऱ्या व दरोडे टाकणाऱ्या एका टोळीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री बाराच्यानंतर मल्टिपर्पज हायस्कूलच्या मैदानाजवळ एक टोयाटो कार क्र.एमएच-०६-टी-८९१६ आढळून आली. कारच्या बाजूस अंधारात दबा धरुन पाच आरोपी बसले होते. त्यापैकी जगदीशसिंघ उर्फ जग्गी पिता दिलबागसिंघ संधू रा.भगतसिंघ रोड नांदेड, करणसिंघ उर्फ किरण पिता किन्हासिंघ बावरी रा.संत गाडगेबाबा नगर कौठा नांदेड, राहूल सुभाष ठाकूर रा.सांगवी यांना पोलीसांनी पकडले. त्यांची व गाडीची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक एअर पिस्टल, सहा जिवंतू काडतूस, एक बारा बोअर रायफल, दोन गावठी कट्टे, एक खंजर आढळून आले. यातील आणखी पाच आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांची टोयाटो कोरोला कार देखील पोलीसांनी जप्त केली असून, एखादा दरोडा टाकण्याच्या तयारीत ते असल्याचे आढळून आले. या सर्व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंधा चरणसिंघ संधू यांचे ते साथीदार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.