लातुर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

उपग्रहांच्या अहवाला ऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पहाणी करून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या रेणापूर सह लातुर जिल्हा दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न पडल्याने पीके उन्हाने करपली. रेणापुर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सिंचन प्रकल्पात पाणी साठा झाला नाही. खरीप पीक गेले असुन पाण्याअभावी रब्बी पेरणीची आशा मावळली आहे. पाणी टंचाई निर्माण झाली आहे, अशी भीषण दुष्काळ स्थिती असताना शासनाच्या दुष्काळ घोषीत करण्याबाबत शासनाने शास्त्रीय निकष व सुधारीत कार्यपद्धतीचा आदेश काढला असून त्यात जुन ते सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस, पावसातील खंड आदीसह पेरणी क्षेत्र, पाणी पातळी, जमीनीतील ओलावा आदी तांत्रिक बाबींचा कृषी विभागाच्या वेब अहवालानुसार दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याने तसेच रेणापूर तालुक्यात पेरणी पूर्व जास्तीचा पाऊस पडल्याने जुन ते सप्टेंबर या कालावधीत ७६% पाऊस वेबवर नोंदवला. तदनंतर किरकोळ स्वरुपाचा पाऊस २१ दिवसाचा खंड न पडता झाला म्हणजे पेरणीपूर्वी मोठा पाऊस झाल्याने जुन ते सप्टेंबर या कालावधीत दुष्काळाच्या पहिल्या कळीत समाविष्ट होण्यासाठी पात्रतेच्या १% जास्त व किरकोळ असला तरी २१ दिवसाचा खंड न पडल्याने रेणापूर तालुका दुष्काळ निकषांच्या पहिल्या कळीतुन वगळला तसेच पीकांची झालेली पेरणी, पीकांची स्थिती व पाणी पातळी जमीनीतील ओलावा याबाबतच्या निकषात जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ वगळता इतर तालुके बसत नसल्याने दुष्काळाच्या निकषाच्या दुसऱ्या कळीतुन संपूर्ण जिल्हा वगळण्यात आल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.

दुष्काळाचा ‌‌‌शासन आदेशानुसार वेब साईटवर नोदणी केलेली तसेच शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती व प्रत्यक्ष स्थिती यात मोठी तफावत असुन सदरचा शासकीय आदेश अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पहाणी व सद्यस्थिती, संभाव्य निर्माण होणारी परिस्थिती जिल्हा प्रशासनाचा अहवाल, या अधारे दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. शासनाचे ‘दुष्काळ जाहीर करण्याचे नविन निकष म्हणजे नैसर्गिक आपत्ती नंतर एक प्रकारे सरकारी अपत्ती’ असल्याचे जाणवते. त्यामुळे उपग्रहांच्या अहवाल ऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पहाणी करून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या रेणापूर सह लातुर जिल्हा दुष्काळ जाहीर करून आवशक उपाययोजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.