
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिवाळी जवळ आल्यामुळे सर्वसामान्य कामगार वर्गामध्ये बोनसचे वेध लागले आहेत. रेल्वे आणि एसटीच्या कामगारांना बोनस जाहीर झाल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱयांनाही बोनसची अपेक्षा वाटू लागली आहे. बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावलेली असली तरी बेस्टच्या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने आजच्या बेस्ट समिती सभेत केली. सर्वपक्षीय सदस्यांनी यावेळी सानुग्रह अनुदानाची मागणी केली.
पालिकेकडून घेतलेल्या 1600 कोटींच्या कर्जाचे हप्ते पूर्ण झाल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावरील मोठा भार कमी झाला आहे. बेस्टच्या 40 हजार कर्मचाऱयांच्या श्रमातून उपक्रमाला हे कर्ज फेडता आले. याची परतफेड म्हणून बेस्टच्या कर्मचाऱयांना यंदा सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी केली. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. बेस्ट प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पातच बोनससाठी तरतूद केलेली नाही. त्यामुळे बोनसबाबत अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर सुहास सामंत यांनी ही सूचना केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा, सुनील गणाचार्य, श्रीकांत कवठणकर, भूषण पाटील यांनीही कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान दिले पाहिजे अशी मागणी केली. गेल्या वर्षी दिलेले सानुग्रह अनुदान 11 हप्त्यांमध्ये कापून घेण्यात आले होते तेदेखील परत करावे, अशी मागणी कवठणकर यांनी केली. दरम्यान, बोनसबाबत एक-दोन दिवसांत महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी चर्चा करून बोनसचा तिढा सोडवू, असे आश्वासन अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी यावेळी दिले.
बोनसच्या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांची गैरहजेरी का?
बोनसच्या मुद्दय़ावर बोलताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी बोनसबाबत अनिश्चितता असताना पालिका प्रशासनासोबत व महापौरांसोबत ज्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्याला विरोधी पक्षनेते गैरहजर का राहिले, असा सवाल तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी यावेळी केला.

























































