स्वाईन फ्ल्यूची मोठ्या प्रमाणावर लागण: आरोग्य यंत्रणा मात्र झोपेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

स्वाईन फ्ल्यूसारख्या गंभीर आजार हळूहळू पाय पसरत आहे. जिल्ह्यात या आजाराने आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील देगलूर नाका भागात एका लहान मुलीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. या आजाराची लागण मोठ्या प्रमााणवर होत असतानाही आरोग्य यंत्रणा मात्र झोपेत आहे.

राज्यात अनेक शहरांमध्ये स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. नाशिक शहरात या आजाराने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यापाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यातही या आजाराची लागन झाली असून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी शहरातील देगलूर नाका भागात आणखी एका लहान मुलीचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या ६ वर गेली आहे.

१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात ४ हजार ४३८ संशयित रुगांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८७ रुग्णांची स्वॅब एनआयव्हीच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील १७ रुग्णांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आढळून आले. दरम्यान यातील पाच जणांचा मृत्यू झाला. चालू आठवड्यात आणखी एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे या आजाराची गंभीरता वाढली आहे. याबाबतीत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली, तरी पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही. स्वाईन फ्ल्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. संसर्गजन्य असा हा आजार असल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही भागात डेंग्यू तसेच व्हायरल फ्ल्यूची साथही पसरली आहे. सरकारी रुग्णालयाप्रमाणे खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर तापीचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सध्याचे वातावरण या सर्व आजारांसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. दिवसा उन्हाळ्याप्रमाणे उष्णता जाणवत आहे. तर रात्रीच्यावेळी काही प्रमाणात थंडी आहे. अशा थंड गरम वातावरणामुळे तापीचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे.