वीजपुरवठा न केल्यास उर्जामंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या – आमदार बाळू धानोरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

वारंवार होणारे भारनियमन, त्यातून होणारा मनःस्ताप आणि नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतात वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. अशीच स्थिती राहिल्यास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कृषीपंपाला नवीन वीजजोडणी देण्याकरिता एचव्हीडीएस (HVDS) योजनेअंतर्गत १९ निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्यात अडीच लाखांपर्यंत विद्युतीकरणाचा खर्च लागणार आहे. ही रक्कम भरणाऱ्यांनाच वीजपुरवठा मिळण्याची अट घालण्यात आली आहे. यापेक्षा जास्त खर्च लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नेमकी काय उपाययोजना आहे हे स्पष्ट नाही. तसेच ही निविदा ३१ मार्च २०१८ पूर्वी अनामत रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच लागू आहे. परंतु, त्यानंतर अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांनी काय करायच? त्यांना वीजजोडणी कधी मिळणार? असा सवाल आमदार धानोरकर यांनी केला.

मागील २ वर्षात जिल्ह्यात अनामत रक्कम भरणारे ४ हजार ३८५ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या शेतकऱ्यांना ८ तास वीज पुरवठा केला जात आहे. त्यातही अनेकदा भारनियमन तसेच तांत्रिक अडचणीमुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. ऐन रब्बी हंगामात पाण्याची नितांत गरज असताना ही स्थिती शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, प्रलंबित कृषिपंपाला त्वरित वीजजोडणी देण्यात यावी, सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा देण्यात यावा, अशा मागण्या आमदार धानोरकर यांनी केल्या आहे.

यासाठी त्यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन दिले आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३१ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासामोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास आपण शेतकऱ्यांसह उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा धानोरकर यांनी दिला आहे.