पुणे नगर मार्गावर भीषण अपघात, एक ठार तर तीन गंभीर जखमी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई 

पुणे नगर रोडवर सणसवाडी येथील भैरवनाथ मंदिराजवळ सकाळी सहाच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका वाहनाचा चालक जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे बाजूकडून शिक्रापूरकडे जाताना दुचाकीस्वारांस वाचविण्याच्या प्रयत्नात अशोक लेलँड कंपनीचा टेम्पोने डिव्हायडर ओलांडून पुण्याकडे चाललेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात टेम्पोचा चालक जागीच ठार झाला. तर टेम्पोतील दोघे व ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाघोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत टेम्पो चालक लक्ष्मीकांत सुभाष गुचीत वय ३५ रा.तुळापूर भावडे, ता.हवेली हा जागेवरच ठार झाला असून या अपघातात गंभीर जखमी झालेले ट्रक चालक दत्तात्रय शिंदे, महेश दवरे व चेतन महंतो या गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना वाघोले येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी पाठवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक तातडीने सुरळीत करण्यात आली.  यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश चव्हाण व पोलीस हवालदार साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.