
>>उदय जोशी । बीड
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कायम नुकसानीत असलेली शेती नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी फळबागांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची आता झोप उडाली आहे. जीवापाड जपलेल्या बागांसाठी आता पाणी आणावे कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला असून एकदा का फळबागा उद्ध्वस्त झाल्या की त्यानंतर काय करावे या चिंतेने बीड जिह्यातील शेतकरी धास्तावला आहे. बीड जिह्यातील तब्बल दहा हजार हेक्टरवरील फळबागा दुष्काळामुळे सलाइनवर आहेत. उपाय सापडला नाही तर या बागा जळून खाक होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
जिह्यात भीषण दुष्काळाच्या दुष्टचक्राने शेतकऱ्यांना कंगाल केले आहे. परंपरागत शेती तोट्यात येत असल्याने शेतकऱयांनी वेगवेगळे प्रयोग राबकत यशाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच फळबागांची शेती बाळसे धरू लागली. जिल्हाभरात तब्बल दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त भागात फळबागा फुलवण्यात आल्या. यात पपई, केळी, टरबूज, डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, जांब, केशर आंबा, ड्रगन, मोसंबी, लिंब या फळांचा समावेश आहे. कापूस, ऊस, तूर, बाजरी, ज्वारी या पारंपरिक आणि नगदी पिकांपेक्षा फळबाग लागवडीवर भर दिला गेला. श्रम, पाणी आणि लागवड खर्च कमी उत्पादनाची जास्त हमी हा मंत्र लक्षात ठेवूनच शेतकरी कामाला लागला.
मात्र फुललेल्या फळबागा भीषण दुष्काळाने उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली आहे. वाताकरणातील बदलामुळे पिकावर रोगराई काढली असतानाच आता पाणीच नसल्यामुळे फळबागा कशा जगवाव्यात असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. तलाव कोरडे पडले, शेततळी आटली, विहिरींनी तळ गाठला, सर्व काही मिळेल पण पाणी कुठून मिळणार? टँकरनेसुद्धा पाणी आणायचे कुठून असा प्रश्न या शेतकऱयांपुढे उभा राहिला आहे.
आगामी काळात पावसाची चिन्हे दिसत नाहीत. रब्बी हंगामसुद्धा कोरडाच जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे यापुढे फळबागा जपायच्या कशा? या चिंतेने शेतकरी भयभीत झाला आहे. यंदा फळबागा जगवल्या नाहीत तर होणारे नुकसान पुढील पाच वर्षे भरून काढता येणार नाही. तळहातावर सांभाळलेल्या या बागा उद्ध्वस्त होतांना पाहत राहणे हेच सध्या तरी शेतकऱयांच्या हाती राहिले आहे.



























































