‘ओएलएक्स’पर चोरी का भी माल बिकता है।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

‘ओएलएक्स’पर सब कुछ बिकता है! या टॅगलाइनचा शब्दश: अर्थ घेऊन दरोड्यातील किमतीऐवज या ऑनलाइन साईटद्वारे विकण्याचा फंडा चोरट्यांनी प्रत्यक्षात आणल्याचे उघड झाले आहे. रायगड, ठाणे, कोल्हापूरसह परराज्यात केलेल्या चोरीतील कार, दुचाकी, मोबाईल, टीक्ही, लॅपटॉप आदी 22 लाखांचा मुद्देमाल ‘ओएलएक्स’ विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या रायगड पोलिसांनी आवळल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत चोरांच्या या मोडस ऑपरेंडेटीची माहिती दिली.

रायगडातील वाढत्या चोऱ्या, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक जमाल शेख यांनी गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील साकर्डे येथील मौअजम अली हुसेन शेख (24) हा सराईत गुन्हेगार रायगड जिल्ह्यात दरोडे घालत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्केषण पथकाने शेख याला सावर्डे येथून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच शेख याने गुन्ह्यांची कबुली दिली. सहा जणांच्या टोळीने रायगड, ठाणे, कोल्हापूरसह परराज्यात चोरी केल्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी मौअजम अली शेख याच्यासह ईश्वर अडसुळे (33) कोल्हापूर, राकेश चांदीवडे (31) नवी मुंबई, सनी जैसवाल (28) चिपळूण, प्रवीण कांदे (27) नालासोपारा, शरद घावे (24) वसई यांना अटक केली.

असा होता फंडा
दरोड्यातील माल बाजारपेठेत विकण्याचा धोका ओळखून तो ‘ओएलएक्स’वर विकण्याचा फंडा चोरट्यांनी अमलात आणला. बनावट नावाने मेल अकाऊंट खोलून त्यांनी चोरीच्या कार, दुचाकी, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप विकण्याचा सपाटा लावला. कमी किमतीत वस्तू मिळत असल्याने त्यांचा मुद्देमाल हातोहात विकला जात होता. ग्राहकांना चोरीचा माल असल्याचा संशयही येत नव्हता. मात्र गुन्ह्याची उकल झाल्यानंतर आता ग्राहकांकडून या वस्तू हस्तगत करण्याचे काम सुरू झाल्यानंतर ग्राहक पस्तावले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 36 मोबाईल, 3 टीव्ही, 4 लॅपटॉप, 1 दुचाकी, 1 कार जप्त केली.

…आणि सराफ अडकला
चोरट्यांनी लुटलेले सोने सांगली येथील सराफ सिद्धार्थ साबळे याला विकले. त्याला दुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखवल्याने तो चोरट्यांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी सांगलीतून त्याला अटक केल्यानंतर त्याने चोरीचे सोने घेतल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 30 तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. या गुह्यातील दुसऱ्या सोनाराचा शोध पोलीस घेत आहेत.

20 गुह्यांची उकल
टोळीतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. माणगाव, पेण, रसायनी, रोहा, कोलाड, दादर सागरी, म्हसळा, शहापूर ठाणे ग्रामीण, कोल्हापूर आदी 20 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली चोरट्यांनी दिली.