
सामना ऑनलाईन । मुंबई
नोयडा येथील खासगी विद्यापीठात शिकणारा 16 वर्षीय कश्मीर विद्यार्थी दहशतवादी संघटनेत सामिल झाला आहे. अहतेशाम बिलाल सोफी असे त्याचे नाव असून तो मूळचा श्रीनगरचा रहिवासी आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात सोफी हा दहशतवाद्यांसारख्या पोशाखात दिसत असून तो आयएसजेके या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे.
नोयडातील शारदा विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सोफीला काही दिवसांपूर्वी विद्यापीठात झालेल्या हिंसाचारात मारहाण झाली होती. त्यानंतर 28 ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी ग्रेटर नोयडा आणि श्रीनगर खनयार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान आता सोफीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातून तो इसिसची संबंधित संघटना असलेल्या आयएसजेकेमध्ये सामील झाल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक जम्मू कश्मीर पोलिसांच्या मदतीन सोफीचा शोध घेत आहेत. दरम्यान सोफीच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 28 ऑक्टोबरला पुलवामा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. पुलवामाला पोहोचल्यानंतर सोफीने त्याच्या घरी फोन केला होता त्यावेळी त्याने तो दिल्लीला असल्याचे त्याच्या वडिलांना खोटे सांगितले होते.



























































