हिंगोलीत गांजाच्या शेतीवर पोलिसांची धाड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जवळाबाजार 

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार पासून जवळच असलेल्या पुरजळ – असोला शिवारात शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शनिवारी धाड टाकली. या वेळी शेतात गांजाची 502 झाडे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नापिकीमुळे हाती काहीच उरत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली असून मी अपंग असल्याने अन्य काही व्यवसाय करू शकत नाही म्हणून गांजाची लागवड केल्याचे संजय हरिभाऊ मगर या शेतकऱ्याने सांगितले.

औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील संजय हरिभाऊ मगर यांच्या पुरजळ – असोला शिवारातील शेतामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस ठाण्याचे एपीआय गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ज्ञानोबा ज्ञानोबा मुलगीर यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह मगर यांच्या शेतात धाड टाकली. त्यावेळी गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, ही माहिती समजल्यावर पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर मोरे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या शेतामध्ये गांजाची 502 झाडे आढळून आल्याचे सांगण्यात आले. अमली पदार्थ तस्करी विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.