
सामना ऑनलाईन,मुंबई
यंदा भयानक दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. येणारा काळही अत्यंत भयंकर असून शेतकऱ्यांनी कमी पाण्यात उत्पादन घेण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. असा मोलाचा सल्ला राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन सिंचन, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन परिषदेत बळीराजाला देण्यात आला. आगामी काळात हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, परंतु त्यांनी नाउमेद न होता आपले प्रयत्न करत राहावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आयसीएआर अंतर्गत कपास प्रायोगिक मध्यवर्ती संस्थेच्या माटुंगा येथील हॉलमध्ये ही परिषद पार पडली. परिषदेला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. पी.जी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. कापसापासून अत्यंत सूबक कपडे निर्मितीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने लक्ष केंद्रित केल्याचे डॉ.पाटील यावेळी म्हणाले. पाटील यांच्याशिवाय परिषदेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकरी बांधव अडचणीत सापडला असून त्यांच्या समस्या शासन आणि संबंधित यंत्रणांकडे आपण मांडणार असून शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी एपीएमसीला रिटेल आणि अन्य माध्यमाने पर्याय उपलब्ध करून दिला जाईल असे मोकल यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे असोसिएट अधिष्ठाता डॉ.यु.व्ही.महाडकर, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे संचालक बुरजीस गोदरेज, मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे व्यवसाय वृद्धी आणि व्यापार विभागाचे प्रमुख समीर पाटील, निपॉन पेंट इंडियाचे अध्यक्ष हरदेवसिंह एस.बी. यांनीही मार्गदर्शन केले. परिषदेला राज्यातील सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































