
सामना प्रतिनिधी । कर्जत
कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्र परिसरात आज ऐन भाऊबीजेच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. मासेमारीसाठी नदीपात्रात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात आई वडीलांसह मुलीचा समावेश आहे.
सीताराम सोमा काटे (50), हिरा सीताराम काटे (45), सारिका सीताराम काटे (17) अशी मृतांची नावे असून ते याच परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये रखवालदारीचे काम करत होते. इतर वेळेत हे कुटुंब मासेमारीचे काम करायचे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या फार्म हाऊस पासून जवळच असलेल्या पेज नदीपात्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. या प्रवाहाचा प्रथम मुलीला जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आई आणि पाठोपाठ वडिलांना सुद्धा वीजेचा धक्का बसल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 8 वाजता सदर घडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. या घटनेचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.





























































