
सामना प्रतिनिधी। जालना
राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलचे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर भाजप आमदाराच्या भाच्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना जालना शहरातील भोकरदन नाका येथे घडली आहे. या हल्ल्यात भीमराव डिघे नावाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या भाच्याने हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्या कुचे यांच्या भाच्यासह आमदार कुचे यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
भीमराव डिघे हा बदनापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचं काम करतो. डिघेंच्या पोस्टवर कुचे यांना आक्षेप होता. या रागातूनच ८ नोव्हेंबर रोजी कुचे यांनी त्याला ‘एक दिवस तुला हे महागात पडेल अशी धमकी दिली होती.’ दरम्यान सोमवारी रात्री ऑफिसचे काम आटोपून डिघे घरी जात असताना आमदार कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे आणि इतर दोघांनी त्याला रसत्यात अडवले. तलवारीने हातावर वार करून त्याच्या पायावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली,अशी तक्रार राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.




























































