
सामना प्रतिनिधी । जळकोट
देशासाठी जीव कुर्बान केलेले जळकोट नगरीचे शहीद जवान लान्स नायक रोहित उत्तमराव शिंगाडे यांना गुरूवारी जळकोट बसस्थानकाच्या प्रांगणात हजारो नागरिकांच्या साक्षीने लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
अत्यंत दुर्गम अशा सियाचीनच्या बर्फाच्छादित पर्वत रांगेत देशसेवेसाठी तैनात असताना जीवाचा थरकाप उडवणाऱ्या प्रचंड थंडीच्या वातावरणात बर्फावर पडून महार रेजिमेंटचे जवान रोहित शिंगाडे (२९) हे गंभीर जखमी झाले होते. सैन्य दलाकडून त्यांना दिल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते आणि अखेर दि.१३ रोजी ते गतप्राण झाले.
दिल्ली येथून त्यांचा पार्थिव देह विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात आला. सकाळी हैद्राबादहून मोटारीने पार्थिव शरीर जळकोट शहरात आणण्यात आले. प्रथमत: पार्थिव शरीर नातेवाईकांच्या अंत्य दर्शनासाठी स्वगृही ठेवण्यात आले. तद्नंतर ते श्री गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ठेवण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या देशभक्त सुपुत्राचे साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले. सकाळी १०.३० वाजता हजारो नागरिकांचा सहभाग असलेली अंत्ययात्रा हनुमान चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, अण्णाभाऊ साठे चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गे बस स्थानकात दाखल झाली. यावेळी सर्वप्रथम जळकोटकरांच्या वतीने नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे यांनी वीरजवान रोहित शिंगाडे यांना पुष्पचक्र अर्पण केले. तसेच लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जळकोट – उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, मेजर विकास सहरावत, जेसीओ बेसरी दास, ७ महार रेजिमेंटचे कॅप्टन मोहीतसिंग अहलावत, नायब सुभेदार बालाजी वाघमारे, नायक सुरज कांबळे, कर्नल शिवनारायण मिश्रा, ले. कर्नल ध्रुपद बॅनर्जी, मेजर सुनील दहिया, ले. कमांडर ओंकार कापले, गौरव कुमार, अरुण प्रतापसिंह, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
नायब तहसीलदार डी.एच. दंताळे, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बालाजी केंद्रे, संतोष तिडके, रुक्मिणबाई जाधव, अनीता परगे, शिवाजी परगे, रा कॉं. चे संजय बनसोडे, पं.स. सभापती व्यंकटराव केंद्रे, उपसभापती स्वाती केंद्रे, सभापती मन्मथ किडे, उस्मान मोमीन, व्यंकटराव तेलंग, सुभाष बनसोडे, अॅड. नरेश सोनवणे, अर्जुन आगलावे पाटील, संग्राम टाले, शेखर डोंगरे, युवराज करेप्पा, जे.डी. गोरे, सी.एस. गावडे, बालाजी सूर्यवंशी, मुख्याधिकारी सोनम देशमुख, अर्जुन वाघमारे, ललीता गायकवाड, शिवानंद देशमुख, पोलीस निरीक्षक मोहमद रफी पटेल, सुधाकर शृंगारे, डॉ. चंद्रकांत काळे, डॉ. अविनाश गट्टेवार, खादर लाटवाले, सोमेश्वर सोप्पा यांच्यासह शेकडो नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण केले.
भदंत नागसेन बोधी यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे थोरले बंधू राहूल शिंगाडे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी घेण्यात आलेल्या शोकसभेत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, आमदार सुधाकर भालेराव, मन्मथ किडे, संजय बनसोडे आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला. यावेळी लष्करचे जवान, पोलीस दल यांच्या वतीने शहीद रोहित शिंगाडे यांना हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. जळकोट शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा प्रचंड जनसमुदाय पहायला मिळाला. आजूबाचे सर्व रस्ते, इमारतींचे छत, वृक्ष अशी सर्वत्र खचाखच गर्दी होती. मुंगी शिरायलाही जागा नव्हती. आपला पुत्र देशाच्या कामी आला, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे त्यांचे वडील उत्तमराव शिंगाडे व त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.





























































