
सामना प्रतिनिधी । जळगाव
शहरापासुन जवळ असलेल्या ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्यावर जुना लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा जात असतांना हा पुल कोसळल्याने अंत्ययात्रेत सहभागी सात ते आठ नागरिक जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान पुल कोसळल्यावरही नागरिकांनी अंत्ययात्रेची डोली खाली पडू न देता मार्ग काढला.
जळगाव शहरातील शिवाजीनगर भागापासुन जवळ असलेल्या ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्यावर दफनभूमीकडे जाण्यासाठी एक लोखंडी पुल होता. हा पुल जुना असून जीर्ण झालेला आहे. सोमवारी दुपारी 12.30 वाजता नारायण हरि घुगरे (गवळी) यांची अत्यंयात्रा या पुलावर जात होती. त्यावेळी पुल अचानक कोसळला. यामुळे अंत्ययात्रेतील सहभागी नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ होऊन एकच खळबळ उडाली.
यानंतर मृत नारायण घुगरे यांची डोली सावरण्यात आली. पुलावरून मृत घुगरे यांची डोली सुरक्षित ठिकाणी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या दुर्घटनेत सात ते आठ नागरिकांना किरकोळ दुखापत झाली. जखमी मधील एका व्यक्तीला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.



























































