
सामना ऑनलाईन, मुंबई
केवळ स्त्रियाच नाहीत, तर आता पुरुषही गालावरच्या खळीच्या प्रेमात पडले आहेत. गालावरची खळी म्हणजेच डिंपल महिलांप्रमाणे पुरुषांच्याही सौंदर्यात भर टाकत असून खळीची हौस भागविण्यासाठी पुरुषही कॉस्मेटिक सर्जरीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. गालावरच्या खळीचे आकर्षण सर्वांनाच आहे. गालावर खळी पडणारे अभिनेत्री, अभिनेता तसेच अगदी सर्वसामान्य व्यक्तीचेही आपल्याला कौतुक काटते. ही खळी सौंदर्यात भर टाकते. त्यामुळे अनेकांना आपल्या गालावरही खळी असावी असे वाटते. यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शस्त्रक्रिया करून कृत्रिमरित्या गालावर खळी पाडून घेतली जात आहे. पुरुषही यात आघाडीवर आहेत.
केवळ सुंदर दिसण्यासाठी
सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. रजत कपूर यांनी सांगितले की, जे. जे. रुग्णालयात असताना मी अशा दोन शस्त्रक्रिया केल्या आणि आता सेंट जॉर्जमध्ये नव्याने कॉस्मेटिक ओपीडी सुरू झाल्याने अनेक लोक येऊन विचारपूस करीत आहेत. अद्याप शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत. मात्र गालावर खळी पाडून घेण्यासाठी लोकांचा कल नक्कीच वाढतो आहे, तर जे. जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले, आमच्याकडे अनेक रुग्ण उपचारासाठी आल्यावर गालावर खळी पाडायची असल्याचे सांगतात. अशावेळी आम्ही त्यांना प्लॅस्टिक सर्जरी विभागात जाण्याचा सल्ला देतो. सुंदर दिसण्यासाठी ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
खळीसाठी अशी होते शस्त्रक्रिया
काही जण गालावर तर काही जण हनुवटीकर खळी पाडून घेतात. लोकल ऍनेस्थेशिया देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. गालाची आतील बाजू ओढून घेतली जाते आणि चेहऱ्यावरील स्नायूंना टाके टाकून खोलगटपणा तयार केला जातो. साधारणत: 15 मिनिटे ते अर्ध्या तासाची ही शस्त्रक्रिया असते. त्यानंतर 3 महिने काळजी घ्यावी लागते. आहारात पथ्यं पाळावी लागतात. त्यानंतर ही खळी कायमस्वरूपी राहते.
कॉस्मेटिक सर्जरीसाठा खासगी रुग्णालयात जवळपास 20 ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र सरकारी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. फक्त औषधांचा खर्च, तोही 2 ते 3 हजार रुपये येतो. त्यामुळे अनेक जण आपल्या गालावर खळी पाडून घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात चौकशी करीत आहेत.
गालावर खळी पाडून घेण्यासाठी आम्हाला फोन येत असतात. यात फक्त महिलाच नाहीत, तर पुरुषांचाही समावेश आहे. वर्षाला मला 10 फोन येतात. त्यापैकी 25 टक्के फोन पुरुषांचे असतात– डॉ. नितीन मोकल, प्लॅस्टिक सर्जन, जीटी रुग्णालय




























































