
सामना प्रतिनिधी । शिवडीउगाव
निफाड तालुक्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या चार दिवसांपासून दुतर्फा अर्धा किलोमीटर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करून शेतातील उभ्या पिकांमध्ये निशाणी केली जात आहे. संबंधितांकडून शेतकऱ्यांना माहिती दिली जात नसल्याने शेतकरी संभ्रमित झाले आहेत. रेल्वे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार की काय याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव, उगाव, निफाड, कसबेसुकेणे, खेरवाडी अशा मार्गाने मध्य रेल्वे गेली आहे. हा रेल्वेमार्ग सध्या दुतर्फा आहे. या मार्गावरून असंख्य रेल्वेगाड्या जा-ये करतात. तसेच लासलगाव, सुकेणे, निफाड, खेरवाडी येथून कांदा व इतर शेतमालाची वाहतूकही रेल्वेमार्गाने होते. निफाड तालुक्यातून गेलेल्या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा बागायती शेती व गावे आहेत. गेल्या चार दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गापासून दोन्ही बाजूंनी अर्धा किलोमीटरपर्यंत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान बागायती शेतांमध्ये विशिष्ट पद्धतीत सांकेतिक चिन्हे करून त्यावर लाकूड रोवले जात आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी लाल निशाण केले जात आहे.
याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा केल्यास रेल्वेचे सर्वेक्षण चालू असल्याचे उत्तर मिळत आहे, मात्र सदरचे सर्वेक्षण नेमके कोणत्या कारणासाठी केले जात आहे याची कोणाकडूनही माहिती मिळत नाही. त्यामुळे रेल्वे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी संपादित करणार की काय याबाबत शेतकऱ्यांत चर्चेला उधाण आले आहे. बागायती शेतीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता निशाण केले जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर दुतर्फा अर्धा किलोमीटर होत असलेल्या सर्वेक्षणाबाबत महसूल प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना अथवा पत्रव्यवहार नाही. याबाबत रेल्वेचे अधिकारीच सविस्तर माहिती देऊ शकतील. निफाड उपविभागात त्याची कोणतीही माहिती नाही.– महेश पाटील, प्रांताधिकारी, निफाड
ज्या गावांच्या हद्दीत हे सर्वेक्षण सुरू आहे त्या गावांच्या ग्रामपालिकांनाही अशा सर्वेक्षणाचा कोणताही पत्रव्यवहार नाही. नेमके काय चालू आहे हे सर्वच घटकांना कळत नाही. अनेक ठिकाणी केलेल्या खुणा व संकेतचिन्हांच्या कक्षेत शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, घरे, शाळा, विहिरी, तलाव येत आहेत तर काही ठिकाणी गावालगतच ही चिन्हे दर्शविली जात आहेत. – संदीप पानगव्हाणे, उपसरपंच, उगाव



























































