
सामना प्रतिनिधी । लोहा
दारुच्या व्यसनी गेलेला आणि वैफल्यग्रस्त माणूस कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. कामाकडे ध्यान दे, सारखे दारू घेत बसू नको असे दररोज टोमने लावणाऱ्या जन्म दिलेल्या आईचा राग मनात धरून दारूच्या नशेत आईचा धारदार वस्तऱ्याने गळा कापला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हिप्परगा ता. लोहा येथे घडली.
लोह्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हिप्परगा (चितळी) गाव आहे. गावात हेअर कटींग सलूनचे दुकान असलेला पांडुरंग यादव कोंडामंगले दारूच्या आहारी गेला. त्याला दोन मुले, एक मुलगी असल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पत्नी माहेरी गेली असता त्याची आई शांताबाई यादव कोंडामंगले (70) हिने त्याला कामधंद्याकडे लक्ष दे, दारू रोजच कशासाठी घेतो असे म्हणताच पांडुरंगला राग आला. रागाच्या भरात धारदार वस्तऱ्याने गळा कापला. उपचाराला नेत असताना शांताबाई यादव कोंडामंगले यांचे निधन झाले. अधिक तपास लोहा पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते आणि माळाकोळी पोलीस करत आहेत. आरोपी पांडुरंग यादव कोंडामंगले यास ताब्यात घेतले आहे.



























































