
सामना प्रतिनिधी । नगर
नगर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचे प्रभाग 7 मधील उमेदवार अशोक बडे, कमल सप्रे, अक्षय कातोरे, रिटा भाकरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीत नागापूर परिसरात झंजावाती प्रचार फेरी काढण्यात आली.
या प्रचार फेरीमध्ये नगरसेविका आशा बडे, दत्तात्रय सप्रे, मदन आढाव, लोभाजी कातोरे, बाबुशेठ नागरगोजे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचार फेरीचे व शिवसेनेच्या उमेदवारांचे नागापूर परिसरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. गाडे म्हणाले, प्रभाग 7 मध्ये शिवसेनेची सर्वात जास्त ताकद आहे, त्यामुळे चारही उमेदवार निवडून येतील. शिवसेनेने दिलेले उमेदवार हे सर्वांना परिचित आहेत , शहरात शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनताही पूर्णपणे शिवसेनेच्या मागे आहे. या निवडणुकीत विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी लोक त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. येथील जनता शिवसेनेचे चारही उमेदवारांना भरभरुन मतदान करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
घनशाम शेलार म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून शहरात विविध विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत सहभागी असल्याने विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे येणार्या काळातही महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, यात शंका नाही.































































