वादग्रस्त विधानप्रकरणी भिडे गुरुजींना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांना आज नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता 14 डिसेंबरला होणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक येथे 10 जून रोजी सभेत ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते’ असा अजब दावा केला होता. या वादग्रस्त वक्तव्याबाबत चौकशी करून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. मात्र, ते कोणत्याही सुनावणीला हजर राहिले नसल्याने न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली, त्या नोटिसीला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. सत्र न्यायालयाने बुधवारी त्यांची हरकत फेटाळून लावली. त्यामुळे आज शुक्रवारी कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीला भिडे गुरुजी हजर झाले. पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाचा हुकूम होईल तेव्हा त्यांना हजर राहावे लागणार आहे. पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होईल, अशी माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी दिली.