कश्मीरात 18 तास धुमश्चक्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल 18 तास चाललेल्या चकमकीत आज तीन दहशतवाद्यांचा श्रीनगरजवळ मुजगुंड भागात खात्मा केला. मारल्या गेलेल्या तिघांमध्ये अवघ्या चौदा वर्षांचा दहशतवादी मुदासीर याचा समावेश आहे. या धुमश्चक्रीत लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे. मुजगुंड भागात दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी जवानांनी या भागाला वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवरच गोळीबार केला. या गोळीबारास जवानांनीही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. काल सुरू झालेली गोळीबाराची ही धुमश्चक्री तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज सकाळी समाप्त झाली. घटनास्थळावरून जवानांनी स्फोटके, शस्त्रास्त्र जप्त केली आहेत.

या धुमश्चक्रीदरम्यान दहशतवादी ज्या घरातून गोळीबार करीत होते ते घरच जवानांनी स्फोटकांनी उडवले. या चकमकीदरम्यान या घरासह सहा घरांचे नुकसान झाले आहे.
ठार केलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्यापि पटलेली नाही. यातील दोनजण स्थानिक तर तिसरा हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असण्याची शक्यता आहे

जवान-फुटीरतावादी तरुण भिडले
18 तास चाललेल्या या चकमकीच्या वेळी फुटीरतावादी तरुणांचा एक गट आणि जवान एकमेकांना भिडले; परंतु जवानांनी या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. तसेच 19 तासांच्या या धुमश्चक्रीदरम्यान कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी सुरक्षा दलांनी मोबाईल, इंटरनेटची सेवा बंद केली होती.

एके 47 सोबत छोटा दहशतवादी
14 वर्षीय दहशतवादी मुदसीर याचे 9वी पर्यंतचे शिक्षण झालेले असून त्याचा ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध होता. गेल्या 31 ऑगस्टपासून त्याचा मित्र बिलालसोबत तो घरातून गायब झालेला होता. या दोघांनाही घरी परत बोलावण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. मुदासीर हा हाजिन बांदीपोराचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी एके-47 घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘हिजबुल’च्या जहांगीरला अटक
‘हिजबुल मुजाहिद्दीन’चा दहशतवादी रियाझ अहमद ऊर्फ जहांगीर (रा. सौदेर दछछान) याला जम्मू-कश्मीरच्या किश्तवार जिल्हयांतून अटक करण्यात आली आहे. तरुणांना दहशतवादाकडे नेण्याचे काम तो करीत असे. एके-47 हाती घेतलेला जहांगीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. श्रीनगरमधील परिमपोरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात आहे. त्याच्या अटकेमुळे आणखी काही दहशतवाद्यांना अटक इतर माहिती उघड होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जहांगीर हा कश्मीरात कार्यरत आहे.