राष्ट्रीय लोकअदालतमध्ये बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात तिसरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

बुलढाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा आणि जिल्हा वकील संघाचे संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकअदालत ही संपूर्ण हिंदुस्थानात राबविण्यात आली. या लोकअदालतमध्ये बुलढाणा जिल्ह्यात एकूण ८७६५१ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आले होते व त्यामधील १४४४९ प्रकरणांमध्ये यशस्वीरित्या तडजोड होऊन २१,४५,४४,०९९ एवढा तडजोड शुल्क व दंड वसूल करण्यात आला. या लोकअदालतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करुन बुलढाणा जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आला आहे.

मुळात बुलढाणा जिल्हा हा ‘क’ श्रेणीत मोडत असताना सुद्धा ‘अ’ श्रेणीतील जिल्ह्यांना महाराष्ट्रात मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार देवकर, जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राहुल दाभाडे, बुलढाणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव साजिद आरीफ सैय्यद यांचे पुष्पगुच्छ देवून बुलढाणा वकील संघातर्फे अभिनंदन केले आणि पुढील राष्ट्रीय लोकअदालतीसाठी शुभेच्छा दिल्या.

या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व प्रकरणातून कराची रक्कम ३,६५,६३,९३० रुपये वसुल झाल्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे उप मुख्यकार्यकारी अधिकारी संजय चोपडे, गटविकास अधिकारी एस.पी. सावळे, सहा. गटविकास अधिकारी बी.बी. हिवाळे व इतर कर्मचार्‍यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव साजिद आरीफ सैय्यद यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. त्यावेळी महेंद्र महाजन म्हणाले की, ग्रामस्थांकडून कराची रक्कम जमा झाल्यानंतर अग्रक्रमाने जास्त कराची रक्कम भरणार्‍या गावांना प्राधान्याने सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे त्या गावातील मुलभूत सुविधा, पाणी, विज व स्वच्छता याबाबत प्रामुख्याने अग्रक्रमाने काम करावे की, जेणेकरुन ज्या गावांनी करांचा भरणा केला नाही त्यांना कर भरणारे गाव आदर्श गाव दिसावे व तेथे संपूर्ण मुलभूत गरजा पुरविण्यात याव्यात. याबाबत उपस्थित पंचायत समिती बुलढाणाचे अधिकार्‍यांनी गावांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.