
सामना प्रतिनिधी । पुणे
रिक्षा आणि जीपची समोरासमोर धडक बसल्यानंतर रिक्षातील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. भर रस्त्यात रिक्षा जळत असताना त्यातून बाहेर येण्यासाठी रिक्षाचालक धडपड करत होता. यामध्ये तो गंभीर भाजला असून, एक प्रवासीही जखमी झाला आहे. दोघांवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बिबवेवाडी येथे घडली.
रिक्षाचालक किशोर गोकुळ नरके (वय २७, रा. पर्वती) हे ७० ते ८० टक्के भाजले आहेत. तर रिक्षातील प्रवासी नाथू मारूती कुकडे (वय ३९, रा. भोर) हे सुमारे २४ टक्के भाजले आहेत. जीप चालक निलेश बांदल (वय २९, रा. तळजाई) यास बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडे तीनच्या सुमारास पुष्पक मंगलकडून अप्पर इंदिरा दिशेने एका बँकेची जीप जात होती. तर नरके हे नाथू यांना रिक्षातून घेऊन बिबवेवाडीकडून स्वारगेकडे जात होते. भारती ज्योती चौकात नरके हे त्यांची रिक्षा कॅनरा बँकेकडून घेऊन आल्यानंतर कट मारून पुढे जात असताना होते. त्यावेळी जीप आणि रिक्षाची समोरा समोर जोरात धडक बसली. रिक्षातील सीएनजी किटचा स्फोट होऊन आवाज झाला. काही कळण्याच्या आतच रिक्षाला आग लागल्याने रिक्षाचालक किशोर नरके आणि प्रवासी कुकडे हे दोघेही आगीमध्ये आडकले. कुकडे हे लवकर बाहेर आल्याने ते सुमारे २० टक्के भाजले. परंतु, नरके यांना लवकर बाहेर पडता आले नाही. भर रस्त्यात रिक्षा जळत असल्याने वाहतूक ठप्प झाली. आगीत गंभीर भाजलेले नरके रिक्षातून बाहेर आल्यांनतर जमीनीवर खाली पडले. काही नागरिकांनी बादलीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अग्नीशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तो पर्यंत रिक्षा जळून खाक झाली. नागरिकांनी रिक्षाचालक नरके यांना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रिक्षाला धडक देणाऱ्या जीप चालकास त्यांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
ते व्हीडीओ मोबाईलमध्ये शूट करण्यात मग्न होते
रिक्षाला आग लागलेली असताना तेथे शेकडो लोक जमा झाले होते. नरके हे आगीमध्ये अडकल्याचे दिसताच या गर्दीतील अवघ्या काही मोजक्यांनी बादलीने पाणी आणुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. या चौकात अनेकजण या घटनेचा व्हीडीओ मोबाईलमध्ये शूट करण्यात मग्न होते.































































