पवईत आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई प्रतिनिधी । मुंबई 

देशातील सर्वात मोठा विज्ञान-तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ख्याती असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ला शुक्रवारपासून पवई येथे सुरुवात झाली. यामध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलेले प्रकल्प पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती.

पवई आयआयटी कॅम्पसमधील केव्ही मैदानावर जपानचा हिरोशी इशिगुरो लॅबने बनवलेला ऍण्ड्रॉइड-यू, जर्मनीचा फुटबॉल खेळणारा बी-ह्यूमन, हंगेरीचा डॅनियल आणि स्वीडनचा फरहात आदी रोबोंचे प्रदर्शन भरले आहे. पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर जसे हावभाव असतील तसेच आपल्या चेहऱ्यावरही प्रकट करणारा फरहात रोबो हा शालेय विद्यार्थ्यांचा फेव्हरीट बनला आहे. तो बोलतो आणि माणसासारखा कामही करू शकतो. ऍण्ड्रॉइड-यू हा रोबो जपानी तरुणीसारखा दिसतो. शालेय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्याने उत्तरेही दिली. बी-ह्यूमन या रोबोंनी फुटबॉल खेळून दाखवला.

‘मत्स्य’चे कारनामे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘मत्स्य’ हा रोबो पाण्याखाली जाऊन काम करू शकतो. जहाज किंवा विमान अपघातानंतर समुद्राखाली गेलेले अवशेष शोधण्यासाठी हा मत्स्य उपयोगी पडू शकतो. मत्स्यमध्ये एक कॅमेराही लावण्यात आला आहे ज्याद्वारे पाण्याखालील हालचालींचा वेध घेता येतो.