
सामना प्रतिनिधी । खालापूर
रसायनी येथील एचओसी कंपनीत गुरुवारी रात्री वायूगळती झाल्याने हाहाकार उडाला. प्रचंड दुर्गंधीने पाच किलोमीटरचा परिसर घुसमटून गेला. 76 माकडे, 100 पक्ष्यांचा या घटनेत अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. कारखान्यापासून जवळ असलेल्या मोहपाडा, आपटा तसेच आंबिवलीसह 20 गावांतील ग्रामस्थांनी भीतीने रात्र जागून काढली. दरम्यान या दुर्घटनेनंतर हे पाप झाकण्यासाठी एचओसीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या आवारातच भलामोठा खड्डा खणून मृत पशुपक्ष्यांची विल्हेवाट लावली. त्यामुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पनवेल तालुक्यातील रसायनी येथे हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल ही कंपनी असून डबघाईला गेल्याने वर्षभरापूर्वीच ती बंद करण्यात आली आहे. मात्र येथील एक प्लाण्ट सुरू असून त्यातून इस्रोसाठी इंधननिर्मितीचे काम केले जाते. हे काम सुरू असतानाच इंधनाच्या टाकीतून बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक वायूगळती झाली. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या वेळीच लक्षात न आल्याने प्रचंड प्रमाणात वायूगळती झाली. तब्बल अकराशे एकरवर असलेल्या या कारखान्याच्या 600 ते 700 एकर जागेवर जंगल असल्याने केमिकलच्या प्रचंड दुर्गंधीने 48 माकडे, 28 वानरे व 100 हून अधिक पक्ष्यांचा काही क्षणात घुसमटून मृत्यू झाला.
- जेसीबीने खड्डा खोदून ‘मृत्यूकांडा’वर माती लोटली
हे भयंकर प्रकरण दडपण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तता पाळत जेसीबीने कारखान्याच्या आवारातच खड्डा खोदून मृत पशू-पक्ष्यांना त्यामध्ये टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संतापजनक म्हणजे रसायनी पोलिसांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर खडा पहारा देऊन प्रसारमाध्यमे तसेच पक्षीमित्रांना आत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे या ‘मृत्यूकांडा’वर माती लोटण्यासाठी कंपनीसह पोलीसही ‘कामा’ला लागले आहेत.
दोन सुरक्षा रक्षक दोन तास बेशुद्ध
प्लाण्टजवळ तैनात असलेले दोन सुरक्षारक्षक जागेवरच कोसळल्यानंतर बंद केबीनमध्ये एसीत बसलेल्या अधिकाऱ्यांची पळापळ झाली. हे सुरक्षा रक्षक दोन तास बेशुद्ध होते. हा हा म्हणता वायूगळती वेगाने वाढल्याने तब्बल पाच किलोमीटर परिसरातील गावांनाही त्याचा फटका बसला. प्रचंड दुर्गंधीने नागरिक घाबरले. अनेकांनी घराबाहेर पळ काढत भीतीने अक्षरशः रात्र जागून काढली.
पशू-पक्ष्यांचे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापनाने वनाधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ केले असून पोलीसही चिडीचूप आहेत. मृत प्राण्यांची संख्या अधिक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आऊल्स प्राणी संघटनेचे अध्यक्ष अभिजित घरत यांनी विभागीय मुख्य वनसंरक्षक मनीषकुमार यांच्याकडे केली आहे.
- प्राणीमित्रांनी आवाज उठवल्यानंतर स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला असून 30 माकडे आणि 16 पक्ष्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच पुरलेल्या अन्य पशू-पक्ष्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. याबरोबरच पंचनाम्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
- एचओसी कंपनीपासून कर्नाळा अभयारण्याची हद्द जवळ आहे. त्यातच कारखान्यासाठी संपादित केलेली 70 टक्के जागा वापराविना पडून असल्याने तेथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे या अभयारण्यातील पशू-पक्ष्यांचा वावर येथे नेहमीच असतो. वायूगळतीसारख्या घडणाऱ्या या घटनांनी येथील प्राण्यांचा जीवच धोक्यात आला आहे.




























































