कुडकुडणाऱ्या कोकणवासीयांना शेकोटीचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा… या गीताच्या ओळी सध्या कोकणात फेरफटका मारल्यास आपसूक ओठी उमटतात. रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर संगमेश्वर परिसरात जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. भरपूर गप्पा आणि कधीकधी वाफाळलेला चहा असं चित्र हल्ली हमखास बघायला मिळतं. शेकोटीजवळ जाऊन बसलं की निखारे पूर्णपणे विझेपर्यंत तिथून उठवत नाही.

थंडीचा हंगाम आला की कपाटातून गरम कपडे बाहेर पडतात. या हंगामात ग्रामीण भागातून गप्पांचे फड रंगतात, ते शेकोटीभोवतीच. रस्त्यावरून जाणारी एखादी अनोळखी व्यक्तीही या शेकोटीमध्ये काही काळ सहभागी होते.  केवळ थंडी उडविण्यासाठीच शेकोटी केली जाते असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. शेकोटी हे एकत्र येण्याचं एक चांगलं निमित्त असतं. शेकोटीभोवती बसल्यानंतर विविध प्रकारची नियोजनं होतात.

शालेय जीवनात स्काऊट-गाईडसह अन्य कॅम्पमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी आवर्जून शेकोटीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.  सध्या पर्यटनातही ग्रामीण पर्यटनाकडे पर्यटकांचा अधिक ओढा आहे. हिवाळ्यातील ग्रामीण पर्यटनात शेकोटीचे खास कार्यक्रम आयोजित केले जातात. शेकोटीभोवती गाणी म्हणणे, भेंड्या लावणे, गोष्टी सांगणे असे मजेदार कार्यक्रम आयोजित केले जातात.

ग्रामीण भागामध्ये घराच्या एखाद्या भागात रात्रभर विस्तव पेटवून ठेवला जातो. यामुळे पूर्ण घरातील वातावरण उबदार बनते. याला ग्रामीण भाषेत ‘पिरसा’ असं म्हणतात. हिवाळा आला की हे पिरसे घरोघरी हमखास दिसतात. शरिराने मुंबई-पुण्यात असलेल्या मात्र मनाने कोकणातच रमणाऱ्यांना या शेकोटींच्या आठवणीची ऊब ही आयुष्यभर साथ देत असते.