परभणी जिल्हा गारठला; तापमान १०.६ अंशावर आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गारठा निर्माण होऊन थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकट्या पेटत असल्याचे चित्र जिल्हाभर पहावयास मिळत आहे. रविवारी १० अंशावर, सोमवारी १२ अशांवर आणि आज मंगळवारी १०.६ अंशावर पारा गेल्याने थंडीचा कडाका कायम वाढत आहे. परभणी शहरात इतर शहराच्या तुलनेत थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. वाढत्या थंडीचा रब्बीच्या पीकांना फायदा होणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

परभणी जिल्ह्याचे तापमान आज मंगळवारी कमाल २५.५ तर किमान १०.६ अशांवर गेले असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याने केली आहे. हे तापमान आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविली असून गेल्याच महिन्यात ९.५ इतके निच्चाकी तापमान झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीच्या कडाक्यापासून बचाव व्हावा, यासाठी शेकडो मोठ्या प्रमाणात पेटविल्या जात आहेत.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. दिवसाही थंडी वाजत असल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी वाढू लागल्याने नागरिक व बच्चे कंपनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. संपुर्ण मराठवाड्यात थंडीचा पट्टा निर्माण झाल्याने परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये हुडहुडी भरली आहे. हवामान खात्याने थंडीचा कडाका आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. वाढती थंडी पाहता बाजारपेठेत उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. तसेच मार्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढत्या थंडीमुळे अत्यंत रोडावली आहे. सायंकाळी ७ वाजेनंतर सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून वाहनांची वर्दळीही कमी होत असल्याचे चित्र शहरीभागात पहावसाय मिळत आहे. तसेच थंडीच्या कडाक्यापासून बचाव व्हावा, यासाठी शेकडो मोठ्या प्रमाणात पेटविल्या जात आहेत. थंडीचा कडाका वाढल्यामुळे दिवसाही थंडी वाजू लागल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. या थंडीमुळे जीनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात यंदा हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी पडू लागली होती. परंतु, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात कमालीची वाढ झाल्याने थंडी कमी झाली होती. जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा थंडी पडू लागली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने हा गारवा निर्माण झाला असल्याचे सांगीतले जात आहे.

जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका पालेभाज्यांना बसणार आहे. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी पीकांना होणार असून रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांसाठी थंडी पोषक मानली जात आहे. सध्या गव्हाचे पिक ओब्यामध्ये असून तर हरभऱ्याचे पीक फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे. अशीच थंडी राहिल्यास ही दोन्ही पिके चांगली येण्यास मदत होणार आहे.