
सामना प्रतिनिधी । नगर
नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात बिबट्या आढळून आला आहे. गावाजवळ असणार्या ठोकळ वस्तीवर काम करणार्या महिलेवर त्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शालिनी सुरेश ठोकळ (32) असे त्या महिलेचे नाव असून तिला उपचारसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली आहे.
शालिनी सुरेश ठोकळ ह्या त्यांच्या वस्ती जवळील मळ्यात जात असतांना नानाश्री फार्महाऊसच्या पाठीमागे उभ्या असणार्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. जीव वाचवून तिने तिथून पळ काढला. घराकडे पळत असताना आरडाओरडा केल्याने बिबट्या ज्वारीच्या पिकामध्ये शिरला. दरम्यान, या प्रकारानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले. कोणीही ज्वारीच्या शेतात जाण्यास तयार नव्हता. नेमका बिबट्याच आहे की दुसरा एखादा प्राणी आहे याची खात्रीशीर माहिती कोणालाही मिळालेली नाही. महिलेचे पती सुरेश ठोकळ यांनी वन विभागाला ही माहिती सांगितली असून दुपारी 3 वाजेपर्यंत वनअधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.































































