मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी, आठ विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दोन विद्यार्थिनींसह आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज रात्री घडली. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले तर तिघांवर कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिठीबाईमध्ये आज कॉलेजियम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘डिवाईन बँड’ला बोलावण्यात आले होते. म्हणूनच कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली.

या चेंगराचेंगरीत आठ विद्यार्थ्यांना जबर मार लागला. कूपर रुग्णालयाचे एएमओ यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन विद्यार्थ्यांच्या छातीला मार लागला असून काही ठिकाणी फ्रॅक्चरही झाले आहे. त्यांना सर्जिकल अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर पाच किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

– जखमी विद्यार्थ्यांची नावे डेव्हिड बंगेरा (20), निखिल पवार (15), हितेश कांबळे (20), कुणाल चव्हाण (17), मॅक्स डिसोजा (18), शदाब शेख (24), कल्याणी अग्रवाल (18), पृथा वेटासकर (19).