दुष्काळाचे दुष्टचक्र परळीतही; येणारा काळ खडतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वानंद पाटील । परळी वैजनाथ

परळीतही आता दुष्काळाच्या झळया पोहचल्या आहेत. या दुष्काळाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांवरही होऊ लागला असल्याचे आता दिसून येत आहे. शेती व शेतमजुरीवर आपल्या परिवाराचे पोट भरणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांचे कंबरडेच मोडले आहे. एकतर हाताला काम नाही त्यामुळे पैशांची आवक थांबली आहे. पाण्याअभावी शेती, उद्योग ठप्प होऊ लागले आहेत. दुष्काळाने ग्रामीण भागाच्या अर्थचक्राला मोठी खीळ तर बसवली आहेच शिवाय परळी शहरातही व्यापारी पेठ ग्राहक नसल्याने ओसाड पडताना दिसून येत आहेत. दुष्काळाचे दुष्टचक्र परळीतही सक्रिय झाले आहे.

एकेकाळी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी गणपती मंदिराच्या बाजूच्या पटांगणात जनावरांचा मोठा बाजार भरायचा मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई चाऱ्याचा अभाव आणि पाणीटंचाई यामुळे हा बाजारही आता म्हणावा तसा भरत नाही. दुष्काळाने असंख्य संकटे समोर आलेली आहेत. यामुळे पशुपालन करणारा शेतकरी मिळेल त्याभावात आपले पशुधन विकण्यासाठी मजबूर झालेला आहे.