ओबीसी आरक्षण संरक्षण बचाव कृती समिती स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आंदोलने चालू आहेत. नुकतेच मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले आहे. हे आरक्षण ओ बी सी कोट्यातून दिले आहे काय? या विषयी ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच भरीस भर म्हणून बाळासाहेब सराटे यांनी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याबाबत नुकतीच मुंबई उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे संतापलेल्या ओबीसी समाज बांधवांनी आज निलंगा येथे ओबीसी आरक्षण संरक्षण बचाव कृती समिती स्थापन केली. यावेळी या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी आरक्षणाची तरतूद केली होती. मात्र अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने ओबीसीना आरक्षण दिले नाही.1990 साली त्यावेळेचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या रूपाने ओबीसीना खरे आरक्षण दिले व त्याची अंमलबजावणी केल्याने ओबीसी समाजाला न्याय मिळाला. हे आरक्षण संपविण्यासाठी भाजप सरकार षडयंत्र करीत आहे. जाती-जातीत भांडण लावण्याचे उद्योग करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाला दिलेले आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले असेल काय? दिले असेल तर आंबेडकरी समाज व ओबीसी समाज रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .

या प्रसंगी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केलेले बाळासाहेब सराटे यांचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी सावता परिषेदेचे जिल्हाध्यक्ष विधिज्ञ गोपाळ बुरबुरे, भारीपचे जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी, रिपाई (डे) चे विलास सुर्यवंशी, विधिज्ञ विठ्ठल आदित्य, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित निंबाळकर, एस टी कामगार संघटनेचे रामेश्वर शानिमे, ओबीसी सेवा संघाचे मोहन क्षिरसागर, धनगर समाजाचे झेटिंग म्हेत्रे, भटक्या समाजाचे नेते विलास माने, काँग्रेसचे दयानंद चोपणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ यांची समयोचित भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सावता परिषेदेचे तालुका अध्यक्ष शरद पेठकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल कांबळे, धनराज कांबळे, दादाराव जाधव, उत्तम माने, आकाश पेठकर ,वामन अंकुश, मोहन पोतदार , विधिज्ञ महेश येरोळकर, पत्रकार गुरुनाथ मोहळकर, मंचक पांचाळ, देवदत्त सुर्यवंशी, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.