बारी कॉलनीत बनावट नोटांचा छापखाना, दोघांकडून ४४ हजारांच्या बनावट नोटा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जिन्सी पोलिसांच्या धडाकेबाज पथकाने बारी कॉलनीतील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी एका घरावर छापा मारून पोलिसांनी टोळीतील दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ४४ हजारांच्या १०० आणि २०० च्या नवीन बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बनावट नोटांचे स्कॅनर असे साहित्य जप्त करत ठाण्यात गुन्हा दाखल केला. छापखान्याचा मास्टर माइंड शोहरत अली हा मुंबईचा राहणारा आहे.

रोशनगेट परिसरातील बारी कॉलनीत बनावट नोटांचा छापखाना असून तयार केलेल्या नोटा बाजारात चलनासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार अयूब पठाण, शेख रफीक, शेख हरुण, भाऊसाहेब जगताप, संजय रोकडे, संजय गावंडे, बाळू थोरात, धनंजय पाडळकर, ज्ञानेश्वर बाविस्कर आदींच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास बारी कॉलनीतील शेख हरुण शेख बशीर याच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी घरातून शंभर नोटांचे १४० बनावट नोटा, दोनशे दराच्या १५० नकली नोटांचे बंडल, असा ४४ हजारांचे बनावट नोटा जप्त केले. तसेच कलर झेरॉक्स प्रिंट असलेले दोन प्रिंटर, कोरे बॉण्ड पेपर, कैची, दहा हजारांच्या खऱ्या नोटा जप्त करत शेख हरुणसह शोहरत अझगर अली या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला.

नोटा चलनात आणल्यानंतर मिळत होता अर्धा वाटा
नोटा छापखान्याचा मास्टर माइंड शोहरत अझगर अली हा मूळ मुंबईचा राहणारा असून, तो नोटा छापून हरुण यास कमिशनवर देत होता. नोटा छापल्यानंतर तो तरुणांना हाताशी धरून बाजारात चालवीत होता. बाजारात रक्कम चालविल्यास त्यास अर्धा वाटा देत होता. तीन दिवसांपूर्वी या दोघांनी ८० हजारांच्या बनावट नोटा छापल्या. त्यापैकी ३५ हजारांच्या बनावट नोटा त्यांनी शहरात चालवल्या. त्यापैकी ४४ हजारांच्या बनावट नोटा उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी जप्त केल्या. नोटांच्या विक्रीतून आलेल्या खऱ्या दहा हजारांच्या नोटाही पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.