एकाच आळीतील गायब झालेली पाच लहान बालके सुखरूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गनिमपूरा भागातून काल दि.२१ डिसेंबर रोजी गायब झालेली पाच लहान बालके आज दुपारी ११ वाजेच्या दरम्यान पुन्हा आपल्या घरी पोहचली आणि हे भितीचे वातावरण संपले.

गनिमपूरा भागात एकाच गल्लीत आसपास राहणारी पाच बालके शहबाज शहा (१०), अब्दुल मुबीन शहा (९), मोहंमद रेहान अब्दुल गफार (१०), शेख समीर कौसर (९), सय्यद जुबेर एकबाल (८) ही पाच बालके अचानकच दोन वाजेच्या दरम्यान गायब झाली. आई, वडिलांनी आणि नातलगांनी शहरातील बऱ्याच जागी त्यांचा शोध घेतला पण ती सापडली नाहीत. इतवारा पोलिसांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास गुन्हा क्र.३५८/२०१८ दाखल केला. पाच बालके एकाच वेळेस गायब झाल्याने अत्यंत भितीचे वातावरण या भागात पसरले होते. पोलिसांनी शोध घेतलेल्या मोहिमेत बालके रेल्वेस्थानकाच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसली होती. आता पुढचा विषय होता कोणत्या गाडीत बसून कुठे गेली. यासंदर्भाने पोलीस मनमाडकडच्या गावांना आणि हैद्राबादकडच्या गावांना संपर्क साधून कोठे कोठे सीसीटीव्ही फुटेज आहेत याची माहिती घेत होते.

आज दि.२२ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही बालके परत आपल्या घरी आली. पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे ही बालके रेल्वेमध्ये बसून पूर्णेला गेली होती. तेथे रात्रभर थंडीत कुडकुडत थांबली आणि सकाळी पुन्हा रेल्वेत बसून नांदेडकडे आली आणि घरी पोहचली. पोलिसांनी या सर्व बालकांच्या आई,वडिलांना बोलावून आणि उपयुक्त मार्गदर्शक सूचना करुन त्यांना पुन्हा आई, वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

एकाच वेळी, एकाच दिवशी पाच बालके एकाच गल्लीतून गायब झाली होती पण सुदैवाने या घटनेला २४ तास होण्याअगोदरच ती बालके घरी आली आहेत. पोलिसांनी या बालकांना विचारणा करुन यापेक्षा काही वेगळे कारण भेटते काय, याचा शोध घेतला, पण ही बालके उगीचच गंमत म्हणून मालटेकडी रेल्वेस्थानकावरुन रेल्वेत बसली आणि पूर्णेला पोहचली. आपल्याला झालेल्या त्रासाला लक्षात ठेवून ही बालके पुन्हा आपल्या घरी परत आली.