
सामना प्रतिनिधी । माहूर
माहूर शहरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. गेल्या सात दिवसांपासून शहरातील आनंद दत्त धाम आश्रम, केरोळी फाटा येथील परमानंद आश्रम व विविध मठावर दत्त नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भाविकांकडून मठांवर अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवदेवेश्वर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालखी सोहळा, सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. तर परमानंद दत्त आश्रम येथे दि. २२ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दत्त नामाच्या गजराने गेल्या सात दिवसापासून माहूर शहरात दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबराच्या गजराने माहूर नगरी दुमदुमून गेली.
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून दत्तभक्ताच्या हजारो दिंड्या माहूर शहरात दाखल झाल्या होत्या. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दत्त शिखर संस्थान मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, माहूरचे तहसीलदार विजयराव अवधाने, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, माहूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, विद्युत वितरणचे उप कार्यकारी अभियंता पंकज देशमुख, सा.बा.चे अभियंता ओमप्रकाश बेंबरे, शाखा अभियंता रविंद्र उमाळे यांनी आपापल्या विभागाच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्याने भाविकांची यात्रा सुखकर झाली. एस.टी.आगाराच्या वतीने पुरेशा बसची व्यवस्था करण्यात आल्याने रहदारी व्यवस्थितपणे चालली. नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने काहीकाळ भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत बसावे लागले.
पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक युनियनच्या वतीने दि.२२ रोजी शहरातील टी-पॉइंट जवळ खिचडी व बुंदीचा महाप्रसाद वितरण करण्यात आले. संदीपानी पब्लिक स्कूल नांदेडचे संचालक सुनील रामचंद्र राठोड पार्डीकर यांच्या कुटुंबियांनी वरण, भात, भाजी पोळीचा महाप्रसाद दिवसभर वितरीत केला तर रेणुकादेवी मंदिर व विविध आश्रमात भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातील लाखो भाविकांनी विविध ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्राकाळात दत्तमंदिरावर मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक अॅड. सुदर्शन देशमुख व कर्मचारी यशवंत जाधव, भागवत मस्के, प्रवीण डोके, एकनाथ शेळके यांनी चोख व्यवस्थापन ठेवल्याने भाविकांना मनमुरादपणे दर्शनाचा लाभ घेता आला. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये न. प. च्या मुख्याधिकारी कु. विद्या कदम, कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, माहूरचे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष व्ही.एस. जाधव आदींचा सहभाग आहे.































































