
सामना प्रतिनिधी । लातूर
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित चाळिसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनास आज शनिवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. साहित्यिकांच्या या मांदियाळीत शहर व परिसरातील विद्यार्थ्यानी सहभागी होत दिंडीतही सहभाग नोंदवला. या दिंडीने उदगीरकरांचे लक्ष वेधले.
१९५६ नंतर ६२ वर्षानी उदगीरला साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ग्रंथ दिंडीचे उद्घाटन ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. त्र्यंबकदास झंवर यांच्या हस्ते संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, मावळते अध्यक्ष रंगनाथ तिवारी, मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे उपसभापती रामदास बेंबडे माजी आमदार मनोहर पटवारी, जि प सदस्य राहुल केंद्रे, भगवानराव पाटील तळेगावकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष बापुसाहेब राठोड, प्रमुख कार्यवाह सुधाकर वायचळकर, कार्यवाह धनंजय गुडसुरकर, चंद्रशेखर मलकमपट्टे आदींसह मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ॲड झंवर व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांचे पुजन करण्यात आले. सजवलेल्या पालखीत हिंदुस्थानचे संविधान, वि.स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी, भालचंद्र नेमाडे यांचे हिंदु हे पुस्तक, तुकाराम गाथा आणि कृष्ण हा ग्रंथ तसेच संत तुकाराम महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. संमेलनाचे अध्यक्ष कांबळे, उद्घाटक झंवर, स्वागताध्यक्ष तिरुके यांच्यासह मान्यवरांनी ग्रंथाच्या पालखीला खांद्यावर घेतले.
या दिंडीत उदगीर शहर व परिसरातील ४५ शाळामधील पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जि प शाळेच्या मैदानावरून निघालेली ग्रंथदिंडी पोलिस स्थानक, कॉर्नर चौक, चौबारा, आर्यसमाज, तळवेस, अण्णाभाऊ साठे चौक, उमा चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक या मार्गे गेली. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले. लालबहाद्दुर शास्त्री शाळेत या दिंडीचा समारोप झाला.
दिंडीच्या स्वागतासाठी शहर सजले होते. ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. नागरिकानी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन अनेक ठिकाणी दिंडीवर पुष्पवर्षाव केला.
या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानी महापुरूष, संतांच्या वेशभूषा करत विविध देखावे सादर केले. बॅन्ड पथक, ढोल पथक, घोडेस्वार, दुचाकीवरील युवती यानी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. ज्या मार्गावरून ग्रंथ दिंडी गेली त्या मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यास मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या दिंडीत राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे, राम मेकले, युवराज जाधव, हावगी बेरकिळे, मसापचे देविदास कुलकर्णी, संयोजन समितीचे दयानंद बिरादार, शिवकुमार डोइजोडे, पद्माकर उगीले, विवेक होळसंबरे, अनिता येलमटे, प्रतिभा मुळे, विक्रम हलकीकर, विनोद मठपती, मल्लेश झुंगा, सुर्यकांत शिरसे, एकनाथ राऊत, रसुल पठाण यांच्यासह मराठवाड्यातून आलेले साहित्यिक सहभागी झाले होते































































