
सामना ऑनलाईन । मुंबई
नाणे बनवण्याच्या जागतिक स्पर्धेत परळच्या रूपल सावंत हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचे अप्रतिम नाणे बनवले. त्यासाठी तिला विशेष पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी तिला जपानला जायचे आहे. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते शक्य होईल की नाही अशी रूपलला चिंता आहे. मात्र तिच्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातील पहिली 25 हजार रुपयांची मदत शिवसेनेच्या वतीने तिला देण्यात आली.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्ची विद्यर्थिनी असलेली रूपल परळच्या डॉ. व्हीअरस वाडी ट्रान्झिट कॅम्प येथे राहते. रूपलला मिळालेल्या पुरस्काराचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित झाले होते. जपान मिंटच्या वतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने पुरस्कार वितरणही जपानला होणार आहे. रूपलला जपानला जाण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचे आवाहन ‘सामना’ने केले होते. त्याला प्रतिसाद देत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी आज रूपलच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले आणि तिला 25 हजार रुपयांचा धनादेश दिला.
याप्रसंगी रूपलचे मामा दीपक कदम, नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, महिला विभाग संघटक लता रहाटे, उपविभाग संघटक रूपाली चांदे, उपशाखाप्रमुख राजा देशमुख, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रथमेश जगताप, महिला शाखा संघटक अनुराधा इनामदार, भाई शेटे आदी उपस्थित होते.























































