
सामना प्रतिनिधी, घोटी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, गुन्हेगारी व लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. हे रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने प्रायोगिक तत्वावर इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे दुतर्फा सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाचे गोंदे ते वडपे असे 90 किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पुढे गोंदे ते धुळेपर्यंत सहापदरीकरण झाले आहे. चौपदरीकरणानंतर या रस्त्यावरील प्रवास सुखकर झाला असला तरी वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघातातही वाढ झाली. परराज्यातील वाहने विश्रांतीसाठी घोटी टोलनाका, पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससमोर थांबत असल्याने लुटमारीच्या घटनाही वाढल्या आहेत.
हे टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ज्या ठिकाणी आंदोलने, तसेच अपघात होतात, लुटमार होते आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे टोल वसूल करणाऱ्या संबंधित कंपनीला आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार घोटीजवळील संवेदनशील समजल्या जाणाऱया सिन्नर चौफुली आणि किनारा हॉटेल येथे सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात गोंदे ते वडपे दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.



























































