जे बोललो नाही ते माझ्या नावावर का खपवता? नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

बँकेशी संबंधित कार्यक्रमात नफा-तोटाविषयक मी बोललो होतो. राजकारणातही कधी यश तर कधी अपयश पदरी पडते त्याचा सामना करावा लागतो हे सहज समजावे हे सांगण्यासाठी निवडणुकीचे उदाहरण दिले. मात्र तर्क लावून त्याचा सोयिस्कर विपर्यास केला गेला. जे मी बोललोच नाही ते माझ्या नावावर का खपवता? जे लिहायचे ते स्वतःच्या नावाने छापा अशा शब्दांत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांवर आपला राग काढला आहे.

पुण्यात काल बँक फेडरेशनच्या कार्यक्रमात गडकरी यांनी राजकारणात अपयशाची जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे. त्यातून नेतृत्वाची संस्थेशी असलेली बांधिलकी दिसते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा संदर्भ पक्षनेतृत्वाशी जोडला गेल्याने गडकरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही!
आगामी काळातील निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडतील. मी पंतप्रधान होणार याविषयी कोण काय बोलतो, कोण काय लिहितो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मी कोणाचाही स्पर्धक नाही. माझे नाव जरी पंतप्रधानांच्या यादीत घेतले जात असले तरी भावी पंतप्रधान मोदीच असतील असा निर्वाळा गडकरी यांनी दिला.