
सामना प्रतिनिधी । मुंबई
सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी दिवस-रात्र एक करणाऱया डॉक्टरांच्या बाबतीत मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. स्टायपेंडबाबत निर्णय घेऊ असे वारंवार आश्वासन देऊनही ते आश्वासन मात्र पाळले जात नाही. मागील दोन महिने राज्यभरातील अशा एक हजारहून अधिक डॉक्टरांना स्टायपेंडही देण्यात आला नाही. यामुळे या लातूर, नागपूर, अंबेजोगाई, संभाजीनगर येथील या निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी शीव रुग्णालयातील ‘मार्ड’ संघटनेशी संबंधित डॉक्टरही मंगळवारी रस्त्यावर उतरले. शीव रुग्णालयाच्या आवारात चक्क फळे विकून त्यांनी आपला निषेध नोंदवला.
…तर काम बंद
50 दिवसांपासून या डॉक्टरांना स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळे हाताला काळय़ा फिती बांधून, फळे विकून आंदोलन करीत आहोत. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ‘काम बंद’ आंदोलन केले नाही. हॉस्टेल ते अधिष्ठाता कार्यालय मोर्चे काढण्यात येतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ‘काम बंद’ आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे.






























































