नाणेघाटातील छत्रपतींच्या पायवाटेची लागली ‘वाट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivaji-maharaj-1

गोपाळ पवार, मुरबाड

हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज ज्या नाणेघाटातील पायवाटेने मोहिमांवर जायचे त्या पायवाटेची आता अक्षरशः ‘वाट’ लागली आहे. प्रत्यक्षात पायवाटांची दुरुस्ती, दगडी पायऱ्या बसवणे, सुशोभीकरण आदी महत्त्वाची कामे न करतादेखील 75 लाखांचा निधी ठेकेदारांनी हडप केला असून  टोकावडे वनक्षेत्रपालाच्या संगनमताने हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.  हा गैरव्यवहार उघडकीस येऊनही वनखात्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला बढती दिल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दगडांची 26 किलोमीटर वाहतूक न करता त्याचे बिल लावल्याने भ्रष्टाचाराचे शिखर गाठले गेले आहे. या नाणेघाटाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने पायवाट व रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पदपथ, दगडी पायऱ्या, पदपथासाठी साखळी आदी विविध कामांसाठी आयुष कन्स्ट्रक्शन, निलांजन एण्टरप्रायझेस, दत्ता कन्स्ट्रक्शन या ठेकेदारांना नियुक्त करण्यात आले.

नाणेघाटातील पायवाटांची कामे प्रत्यक्षात केलीच नाहीत. टोकावडे येथील वनक्षेत्रपाल तुळशीदास हिरवे यांनी ठेकेदारांशी संगनमत करून  75 लाखांचे बिल अदा केले. याप्रकरणी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत यांनी या सर्व कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर उपमुख्य वनसंरक्षक आर. एस. कदम यांनी विभागीय वनाधिकारी (दक्षता) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. या समितीने नाणेघाटप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून तसा अहवालदेखील सादर केला आहे.

अहवालातील निष्कर्ष
– ठेकेदारांना मॉर्टर विरहित घडीव दगड बांधकामात पायऱ्या बांधल्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात  जागेवरच उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या दगडांचा वापर पायऱ्यांच्या बांधकामासाठी केला आहे.
– नाणेघाटातील पायवाटेच्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठलेही खोदकाम न करताना भिंतीसाठी खोदकाम केल्याची नोंद करण्यात आली आहे.
–  पायऱ्यांलगतच्या भिंती ड्राय रँडम रबलद्वारे बांधल्याचे कागदोपत्री  दर्शवण्यात आले असून प्रत्यक्ष जागेवर भिंतीसाठी झिजलेल्या दगडांचा वापर केला आहे.
–  मंजूर अंदाजपत्रकातील दरांनुसार दगडांची वाहतूक 26 किलोमीटर अंतरांवरून केल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. वास्तविक बाहेरून दगड न आणता स्थानिक निकृष्ट दगडच वापरल्याने वाहतुकीचा प्रश्नच उद्भवत नाही.

… तर ‘त्या’ गद्दारांचा कडेलोट केला असता
नाणेघाटातील छत्रपतींच्या पायवाटांच्या कामांची ठेकेदारांनी पुरती वाट लावली आहे. काम न करताही सरकारी पैसे लाटल्याची गद्दारी  केली असून हा प्रकार स्वराज्याच्या काळात झाला असता तर शिवाजी महाराजांनी या गद्दारांचा कडेलोट केला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया मुरबाडमधील शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.