
सामना प्रतिनिधी । मुंबई
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ केबल टीव्ही चॅनेल्सचे दरही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत. सरासरी साडेतीनशे रुपयांमध्ये पाचशे टीव्ही चॅनेल्स बघायला मिळतात पण टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या चुकीच्या धोरणामुळे आता 200 ते 250 चॅनेल्स बघायला मिळणार आहेत. या दरवाढीमुळे एकीकडे केबलचालक उद्ध्वस्त होणार आहेत तर दुसरीकडे ग्राहकांवर प्रचंड आर्थिक बोजा येणार आहे. ‘ट्राय’च्या नव्या धोरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यातील केबल ऑपरेटर 27 डिसेंबरला संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत केबल सेवा बंद आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या प्राइम टाइमला केबल टीव्हीला मुंग्या लागतील.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने नवीन दरपत्रक जारी केले आहे. जेवढे चॅनेल्स बघायचे असतील त्याचेच पैसे मोजा अशी नवीन योजना आणली आहे. पण राज्यातील सर्व केबल ऑपरेटर्सनी या नवीन दरपत्रकाला विरोध केला आहे. या नवीन दरपत्रकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र केबल ऑपरेटर्सची आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
त्यापूर्वी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका विषद केली. ते म्हणाले की, येत्या 29 डिसेंबरपासून नवीन दरपत्रक लागू करण्याची घोषणा ट्रायने केली आहे. पण ही दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे, तसेच केबलचालकांना उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे या नवीन दरपत्रकाला विरोध आहे .
किमान बिल 719 रुपये
हवे ते चॅनेल निवडण्याचे ग्राहकांना स्वातंत्र्य मिळणार अशी ट्रायने जाहिरात सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाटते की यात दरवाढ नाही. पण ही दरवाढच आहे असे अनिल परब म्हणाले. नवीन नियमाप्रमाणे 100 फ्री टू एअर चॅनेलसाठी 130 रुपये मोजावे लागतील. म्हणजे सर्वसाधारणपणे जे चॅनेल कोणी बघत नाही त्यात या 100 चॅनेल्सचा समावेश असेल. त्यानंतर पुढील 25 फ्री टू एअर चॅनेल्ससाठी 20 रुपये मोजावे लागतील. म्हणजे 125 चॅनेल्सची किंमत 150 रुपये होईल. त्यानंतर ग्राहकांच्या आवडीच्या चॅनेलचे बुके तयार होईल. त्यात मनोरंजन, बातम्या, क्रीडा, वन्य जीवनाशी संबंधित चित्रपट असतील. मात्र त्यात मराठी वाहिन्या नसतील. त्याची किंमत तीनशे रुपये होईल. म्हणजे या सर्व चॅनेल्सचे 450 रुपये होतील. मध्यंतरी झालेल्या एका पाहणीनुसार 32 चॅनेल्स असे आहेत की जे प्रत्येक घराघरात पाहिले जातात. त्यातील प्रत्येक चॅनेलची किंमत 15 रुपये आहे. म्हणजे त्याचे 480 रुपये होतात. म्हणजे किमान फ्री टू एअर चॅनेलचे 130 रुपये व घराघरात पाहिल्या जाणाऱया 32 चॅनेल्सचे 130 रुपये असे मिळून 610 रुपये होतील. त्यावर अठरा टक्के जीएसटीचे 109 रुपये होतील. अशाप्रकारे एसडी चॅनेल्ससाठी 719 रुपये मोजावे लागतील. सध्या केबलचालक 350 रुपयांमध्ये 500 चॅनेल दाखतात. पण ट्रायच्या नवीन दरपत्रकानुसार 200 ते 225 चॅनेल्ससाठी तब्बल 719 रुपये मोजावे लागतील असे अनिल परब यांनी निदर्शनास आणले.
तीन तासांचा बंद
ट्रायच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी 27 डिसेंबरला संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत सर्व केबल आँपरेटर तीन तासांचा केबल बंद आंदोलन पुकारणार आहेत. संध्याकाळी सात ते दहा या वेळेत कोणत्याही प्रकारची केबल दिसणार नाही असे अनिल परब यांनी जाहीर केले.
परदेशी कंपन्यांचे उखळ पांढरे
आता आपण जे चॅनेल्स विकत घेणार त्यातील 80 टक्के पैसे परदेशी वाहिन्या घेऊन जाणार आहेत. परदेशी कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी व त्यांच्या तुंबडय़ा भरण्यासाठी हे धोरण आखले जात आहे. कारण 130 रुपयांमधील 65 रुपये केबल आँपरेटरला तर 65 रुपये मल्टी सर्व्हिस आँपरेटरला मिळतील. पूर्वी कॅस लागू होता तेव्हा केबल ऑपरेटरला 72 रुपये मिळत होते. पण सर्वच क्षेत्रांत दरवाढ होऊनही केबलचालकाचे पैसे कमी होऊन 72 रुपयांवरून 65 रुपये झाले. त्यामुळे केबलचालकांनी या धोरणाचा निषेध केला आहे.
स्टार कंपनीवर मोर्चा
हे सर्व षड्यंत्र स्टार कंपनीने रचले आहे. परदेशात पैसे नेणाऱया स्टार कंपनीला धडा शिकवण्यासाठी 28 डिसेंबरला केबलचालकांचा स्टार कंपनीवर मोर्चा काढण्यात येईल. केबल ऑपरेटर व ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम तत्काळ थांबवा अन्यथा येत्या पंधरा दिवसांत तुमच्या विरोधात आंदोलन पुकारावे लागेल. स्टार कंपनीचा एकही बुके केबलचालक दाखवणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.
कायदेशीर आव्हान
ट्रायच्या विरोधात आम्ही रस्त्यावर लढाई लढणार आहोतच पण दरवाढीला कायदेशीर आव्हानही देणार आहोत असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.



























































