
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ग्राम पंचायतच्या ग्रामसेविका विरोधात येथील सुमेध सुरेश गावडे यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत भरत पनासे, संजय कविटकर सहभागी आहेत.
ओटवणे ग्राम पंचायतच्या विद्यमान ग्रामसेविकेने २९ डिसेंबर २०१७ पूर्वी १७ लाख रुपयांचा आर्थिक अपहार केला असल्याचे ग्राम पंचायत विस्तार अधिकारी यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. मात्र, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी आर्थिक तडजोड केल्याने पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविलेला नाही. अपहार झाल्याची नोटीस देऊन ती रक्कम भरणा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ग्राम सेविकेला फौजदारी कारवाई पासून वाचविणारे विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कारवाई करावी. तसेच ग्रामसेविकेवर फौजदारी करून तिला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सुमेध गावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. अन्यथा १ जानेवारी २०१९ रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे गावडे जिल्हा परिषद समोर उपोषणास बसले आहेत.





























































