
सामना प्रतिनिधी । मुंबई
अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्यापूर्वी कादर खान यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत मुंबई विद्यापीठाच्या युसुफ इस्माईल महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअर या क्षेत्रातील पदवी मिळवली. ज्या बळावर त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील धडे गिरवण्यास मदत केली. एम. एच. साबू सिद्दीकी महाविद्यालयात त्यांनी सुरुवातीचे काही दिवस प्राध्यापकाची नोकरी केली.
खडतर प्रवास
अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये जन्म झालेल्या कादर खान यांचे कुटुंब हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले होते. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले. मुंबईतील झोपडपट्टीत त्यांचे बालपण गेले. घटस्फोटानंतर त्यांच्या आईची इच्छा नसतानाही दुसरं लग्न लावून देण्यात आले. सावत्र वडील कादर खान यांना खूप त्रास द्यायचे. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, त्यांना आठवड्यातून तीन दिवस जेवण मिळायचे आणि तीन दिवस भुकेल्यापोटी झोपावे लागत असे. अशा संघर्षात कादर खान यांचं बालपण गेले.
विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम…
दमदार डायलॉगबाजी
‘विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महिना 8 दिन और ये सोलहकां घंटा चालू है.’ अग्निपथ सिनेमातील ही सुपरडुपर हिट डायलॉग कादर खान यांनी लिहिला. हा डायलॉग सिनेरसिक कधीच विसरू शकत नाहीत.
अमिताभ बच्चन आणि कादर खान हे समीकरण रुपेरी पडद्यावर हिट होते. अँग्री यंग मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘अग्निपथ’मधील दमदार संवादांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. टाळ्या आणि शिट्टय़ांची दाद दिली. ‘दुनिया को कोई जगह इतनी दूर नही है जहा पे जुर्म के पांव मे कानून अपनी फौलादी जंजीरे पहना ना सके’, ‘जिंदगी तो खुदा की रहमत है… जो नही समझा उसकी जिंदगी पे लानत है’ त्यांच्या लेखणीतून साकारलेले हे दमदार संवादही तुफान गाजले.
…म्हणून कॉमेडी सिनेमांकडे वळले!
सुरुवातीच्या काळात सिनेमांमध्ये मुख्य व्हिलनची भूमिका साकारणारे कादर खान पुढे कॉमेडी सिनेमांकडे कळले. तुझे वडील संपूर्ण सिनेमात हीरोला मारतात. शेवटी स्कतः मार खातात असे त्यांच्या मुलांना शाळेत चिडवायचे. त्यानंतर कादर खान यांनी कॉमेडी सिनेमांकडे वळण्याचे ठरवले. ‘हिंमतवाला’ चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यातली विनोदी भूमिका त्यांनीच करण्याचे ठरवले. ही भूमिका गाजल्यावर पोस्टरवर जितेंद्र आणि श्रीदेवीसोबत कादर खानदेखील पोस्टरवर झळकू लागले. आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. नव्वदच्या दशकात कादर खान आणि गोविंदा या जोडीने ‘साजन चले ससुराल’, ‘कुली नंबर कन’, ‘अखियोंसे गोली मारे’, ‘दुल्हे राजा’, ‘बनारसी बाबू’ असे अनेक हिट सिनेमे दिले.
तीन वेळा फिल्मफेअर
कादर खान यांनी चार दशकांच्या आपल्या बॉलीवूडच्या प्रवासात अनेक दमदार भूमिका वठवल्या. त्यांच्या अभिनयाची आणि लिखाणाची दखल घेत त्यांना तब्बल तीन केळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1882 साली ‘मेरी आवाज सुनो’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संवादलेखन, 1991 साली ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, 1993 साली ‘अंगार’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा पुरस्कार त्यांनी पटकावला.
कब्रस्तानात मिळाली पहिली भूमिका
कादर खान यांच्या अभिनयाच्या प्रवासात अभिनेते अशरफ खान यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनीच कादर खान यांना अभिनयाची पहिल्यांदा संधी दिली होती. कादर खान साधारण आठ ते नऊ वर्षांचे असताना त्यांची आई त्यांना नमाज पठण करण्यासाठी तेथील एका मस्जिदमध्ये पाठवत असे. मात्र कादर यांचे मन दुसरीकडेच रमायचे. मस्जिदमध्ये न जाता ते कब्रस्तानमध्ये जायचे. तासनतास तिथे जाऊन एकटेच गप्पा मारायचे. तिथेच त्यांचे नशीब पालटले.
एकदा तिथेच कादर खान यांची भेट अशरफ खान यांच्याशी झाली. त्यावेळी अशरफ हे रोमियो-ज्युलिएट यांच्यावर वामक आजरा या नाटकाची निर्मिती करत होते. या नाटकासाठी ते अशा तरुण राजकुमाराच्या शोधात होते ज्याला 40 पानांचे स्क्रिप्ट लक्षात राहील. या नाटकातील भूमिकेसाठी अशरफ यांनी कादर खान यांना विचारले. त्यांचा होकार मिळाल्यावर दुसऱ्या दिवसापासून अभिनय शिकायला घरी बोलावले. नाटकात कादर खान यांनी साकारलेला यंग प्रिंस विशेष भाव खाऊन गेला. प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांची दाद दिली. त्यांच्या अभिनयाने भारावलेल्या एका वयोवृद्ध चाहत्याने त्या वेळी त्यांना 100 रुपयांचे बक्षीस दिले होते.
बॉलीवूड शोकाकुल
- माझ्या अनेक यशस्वी चित्रपटांतील संवादाचे लेखक कादर खान होते. ते रंगभूमीवरचे उत्तम नटही होते. त्यांना विनम्र अभिवादन.
– अमिताभ बच्चन, अभिनेता - कादर खान हे हिंदुस्थानातील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्यासोबत काम करताना सेटवर खूप काही शिकायला मिळायचे. ते उत्कृष्ट लेखकदेखील होते. त्यांची खूप आठवण येईल. – अनुपम खेर, अभिनेता
- बॉलीवूडमधले सर्वात मोठे खान… कादर खान. खलनायक, विनोदी, गंभीर अशा वाट्याला आलेल्या भूमिका ते त्याच ताकदीने साकारून प्रेक्षकांना आश्चर्य चकित करायचे. ते फक्त कलाकार नव्हते. त्याहीपेक्षा मोठे होते.
– परेश रावल, अभिनेता - कादर खान यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले होते. तो खूपच प्रेरणादायी अनुभव होता. ते नेहमी आमच्या हृदयात जिकंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
– अनिल कपूर, अभिनेता - कादर खान हे माझे फक्त गुरू नाही तर वडिलांप्रमाणे होते. त्यांनी ज्या स्टारला साथ दिली तो सुपरस्टार झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
– गोविंदा, अभिनेता
























































